स्टेंटसह विविध 22 वैद्यकीय साहित्यावर ‘एमआरपी’ छापणे बंधनकारक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2017

स्टेंटसह विविध 22 वैद्यकीय साहित्यावर ‘एमआरपी’ छापणे बंधनकारक


मुंबई, दि. 16 : रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापर असणाऱ्या वैद्यकीय उपकरणे व साहित्याच्या किमतीवर नियंत्रण आणावे, तसेच त्या साहित्यावर कमाल किरकोळ विक्री किंमत छापणे (एमआरपी) बंधनकारक करावे, अशी मागणी राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी केंद्र शासनाकडे वारंवार केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या 22 वैद्यकीय उपकरणे व साहित्यांवर कमाल किरकोळ विक्री किंमत छापणे बंधनकारक असून या किमतीनुसारच त्याची विक्री करण्याच्या सूचना राष्ट्रीय औषध किमत निर्धारण प्राधिकरणाने (नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग अथॉरिटी) उत्पादक कंपन्यांना केली आहे. यामध्ये हृदयरुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या कॅथेटर, लेन्सेस, स्टेंट, रक्ताच्या पिशव्या आदींचा समावेश आहे.
केंद्र शासनाच्या रसायने व खत मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग अथॉरिटी या संस्थेने वैद्यकीय उपकरणे व साधनांवरील कमाल किरकोळ किमतीसंदर्भात देशातील सर्व उत्पादक, वैद्यकीय संस्था,संघटना, सर्व राज्यांचे मुख्य सचिव, राज्य औषध नियंत्रक यांना या संबंधीच्या सूचना पाठविल्या आहेत. या सूचनेमुळे या उपकरणाच्या कमाल छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम रुणांकडून आता घेता येणार नाही.

वैद्यकीय उपचारांमध्ये उपयुक्त असलेल्या कॅथेटर स्टेंट,निडल्स, सिरिंग्ज, ड्रग्स स्टेंट, कार्डियाक स्टेंट, सर्जिकल ड्रेसिंग,इन्ट्रा ओक्यूरल लेन्सेस आदी दैनंदिन वापराच्या वैद्यकीय साहित्यावर कमाल किंमत नमूद केली नसल्यामुळे रुग्णांना जादा रक्कम द्यावी लागत असल्याचे आढळून आले होते. या गोष्टीची दखल घेऊन औषध प्रशासन मंत्री बापट यांनी या साहित्याच्या किमतीवर नियंत्रण आणून अशा साहित्यावर कमाल विक्री किंमत छापणे (एमआरपी) बंधनकारक करावे, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे वारंवार केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन राष्ट्रीय औषध किमत निर्धारण प्राधिकरणाने नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध करून विविध 22वैद्यकीय साहित्य/उपकरणे ही नॉन शेड्युल फॉरम्युलेशन प्रवर्गात आणली असून या साहित्यावर कमाल विक्री किमत छापणे बंधनकारक केले आहे. तसेच औषध किमत नियंत्रण आदेश 2013नुसार या उपकरणांची किमत यादी निर्गमित करणे बंधनकारक असल्याचे यात नमूद केले आहे. तसेच या छापील किमतीनुसारच या वस्तूंची विक्री करणे आवश्यक असल्याचेही या सूचनेत नमूद केले आहे.

या उपकरणावर कमाल विक्री किंमत छापणे यामुळे बंधनकारक झाले असून या किमतीच्या वर रुग्णांकडून रक्कम घेता येणार नाही. त्यामुळे हृदयरोगामध्ये आवश्यक असणाऱ्या स्टेंटसारख्या वैद्यकीय वस्तूची किमत आवाक्यात येणार असल्याचे राज्याचे औषध प्रशासन मंत्री बापट यांनी सांगितले.

Post Bottom Ad