नवी दिल्ली - सोशल माध्यमाच्या जगतामध्ये आघाडीवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल माध्यमांवरील उपस्थितीसाठी एकही रुपया खर्च केला जात नसल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. 'आप' नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सामाजिक माध्यमांवरील उपस्थितीसाठी कुठल्याही पद्धतीचा वेगळा खर्च केला जात नाही. पंतप्रधानांचे 'पीएमओ इंडिया' हे अँपदेखील एका स्पध्रेमध्ये विद्यार्थ्यांकडून बनविण्यात आले आहे. ही स्पर्धा माय गव्हर्नमेंट आणि गुगलकडून घेण्यात आली होती. या स्पध्रेसाठी असलेली पुरस्कार रक्कमही गुगलने दिली होती. पंतप्रधान कार्यालयाकडून हाताळल्या जाणार्या मोदींच्या फेसबुक, ट्विटर, यू-ट्यूब, गुगल खाते आणि जी-मेलसारख्या सामाजिक माध्यमावर प्रचाराचे कुठलेही अभियान राबविले जात नाही आणि या सर्व माध्यमांना सांभाळण्यासाठी कुठलाही वेगळा खर्च केला जात नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने 'आरटीआय'च्या उत्तरात म्हटले आहे.
गुगल स्टोअरवर उपलब्ध असलेले पीएमओ इंडिया हे अँप लाखो लोकांनी डाऊनलोड केलेले आहे. तर मोदींचे 'फेसबुक'वर ४ कोटी ३ लाख, 'ट्विटर'वर २ कोटी ७९ लाख, गुगल प्लसवर ३२ आणि इन्स्टाग्रामवर ६५ लाख फॉलोअर आहेत.