डॉ. आंबेडकर स्मारक उभारण्याकरीता 50 कोटी रुपयांची विशेष तरतूद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 March 2017

डॉ. आंबेडकर स्मारक उभारण्याकरीता 50 कोटी रुपयांची विशेष तरतूद



मुंबई, दि. 29 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आज पार पडलेल्या 142 व्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 6 हजार 976.50 कोटी रुपयांचा 2017-2018 साठीचा अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पात इंदू मिलमधील जमिनीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याकरीता 50 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. 4.84 हेक्टर इतक्या इंदू मिलच्या जागेवर भव्य स्तूप, सभागृह. प्रेक्षागृह, वस्तु संग्रहालय, ग्रंथालय, बगीचा आणि पार्किंगकरीता जागा इत्यादींचा समावेश असलेले स्मारक उभारले जाणार आहे. 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात मेट्रो मार्ग, शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू, मोनोरेल टप्पा - 2, मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी उड्डाणपूल, खाडी पूल आणि रस्त्यांचे जाळे निर्माण करणे आणि जलस्त्रोतांच्या विकासाबरोबरच वांद्रे- कुर्ला संकुलाची सुधारणा अशा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे.

अर्थसंकल्पामध्ये डीएन नगर ते दहिसर मेट्रो-2 अ मार्गिका (18.5 कि.मी मार्ग, 17 स्थानके) आणि अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो-7 मार्गिका (16.5 कि.मी. मार्ग, 14 स्थानके) करिता प्रत्येकी रु.1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्गिकेसाठी रु. 800 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे आणि डी .एन.नगर ते मंडाले मेट्रो-2 ब (23.5 कि.मी.मार्ग, 22 स्थानके,) व वडाळा – घाटकोपर- ठाणे- कासार वडवली मेट्रो-4 मार्गिका (32 कि.मी. मार्ग, 32 स्थानके) करिता प्रत्येकी रु. 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नुकताच मान्यता मिळालेल्या ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5 (24 कि.मी. मार्ग, 17 स्थानके) आणि स्वामी समर्थ नगर-जे.व्ही.एल.आर.- सिप्झ-विक्रोळी मेट्रो-6 (14.5 कि.मी. मार्ग, 13 स्थानके) मार्गिकांकरिता प्रत्येकी रु.5 कोटींची तरतूद केली आहे.

दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर मेट्रोस मार्गासाठीप्राधिकरणाने आज नव्याने 13 किमी लांबीच्या दहिसर (पूर्व) ते मिरा-भाईंदर या मेट्रो-9 च्या मार्गास मान्यता दिली. या मेट्रो मार्गात 10 स्थानके असतील. या प्रकल्पाकरीता आवश्यक असलेल्या जमिनीच्या भूसंपादनाकरीता होणारा खर्चासह रु. ६ हजार ५१८ कोटी इतका आहे.

वडाळा ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेलसाठी 208 कोटी रुपयेवडाळा ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल दुसऱ्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पामध्ये रु.208 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली असून ही मार्गिका वर्षाअखेरीस खुली होणे अपेक्षित आहे. चेंबूर-वडाळा- संत गाडगे महाराज चौक या संपूर्ण 20 कि.मी. लांबीची ही मार्गिका रेल्वेने न जोडलेल्या परिसरांशी जोडली जाणार आहे. ज्यामूळे प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सहजरित्या पोहचणे शक्य होणार आहे.

शिवडी न्हावा-शेवा सागरी सेतूसाठी 1200 कोटी रुपयेशिवडी न्हावा-शेवा सागरी सेतू प्रकल्पाच्या (22 कि.मी.मार्ग, रु.17,843 कोटी) अंमलबजावणीस चालना मिळण्याकरीता अर्थसंकल्पात १ हजार २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर मुंबई-पुणे महामार्ग आणि त्यापुढे दक्षिण भारताच्या दिशेने जाण्याकरिता सोयिस्कर मार्गिका उपलब्ध होईल. मुख्य भूमीच्या विकासाकरीता हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

मुंबई शहराप्रमाणेच मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाकरिता आणि रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याकरीता 700 कोटी रु. ची तरतूद करण्यात आली आहे. उड्डाणपूल, खाडी पूल आणि रस्त्यांचे जाळे यामुळे महानगर प्रदेशाला मुंबई शहराप्रमाणेच इतर परिसरांशी उत्तम जोडणी मिळणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलाच्या विकासाकरिता 75 कोटी रुपयांची तरतूद प्राधिकरणाने अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे संकुलात अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच संकुलामध्ये नेहमी येणाऱ्या जाणाऱ्यांबरोबरच भेट देणाऱ्यांकरिता विद्युत/हायब्रीड बसेसची सुविधा उपलब्ध होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलाचे रुपांतर स्मार्ट सिटी मध्ये करण्याकरिता ही दीर्घकालीन तरतूद असणार आहे.

विस्तारित सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला पूलापर्यंत उन्नत मार्ग बांधण्याकरिता 50 कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. 5 किमी लांबीच्या उन्नत वाकोला-कुर्ला मार्गामुळे वांद्रे-कुर्ला संकुलास उत्तम जोडणी उपलब्ध होण्याबरोबरच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

छेडा नगर येथे उड्डाणपूल व उन्नत रस्ताछेडा नगर येथे सांताक्रुझ-चेंबुर जोड रस्त्यापासून आणि पूर्व द्रुतगती महामार्गापासून येणारी वाहने एकाच ठिकाणी जमा होत असल्यामुळे या परिसरात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ही कोंडी दूर करण्यासाठी दोन उड्डाणपूल आणि एक उन्नत रस्ता बांधण्याकरिता 20 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हा 80 मी. लांब आणि 3 मार्गिका असणारा उड्डाणपूल सध्या अस्तित्वात असणाऱ्या 3 मार्गिकेच्या उड्डाणपुलाशी समांतर असणार असून तो सायन ते ठाण्याच्या दिशेने जाणारा असेल. तर 1240 मी. लांब आणि 2 मार्गिकांचा असणारा दुसरा उड्डाणपूल हा छेडा नगर येथे अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलावरुन जाणार असेल. ज्यामुळे नवी मुंबईपासून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीस या उड्डाणपुलाचा वापर करता येणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर 650 मीटर लांब आणि 2 मार्गिका असणारा उन्नत रस्ता छेडा नगर येथील सध्याच्या उड्डाणपुलाला अमर महल जंक्शन उड्डाणपुलाशी जोडला जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च रु. 249 कोटी रुपये इतका आहे.

जलस्त्रोत विकासासाठी 300 कोटी रुपयेजलस्त्रोत विकासाकरिता 300 कोटी रुपयांची तरतूद प्राधिकरणाने केली आहे. मिरा-भाईंदर आणि वसई-विरार नगरपरीषदा तसेच भाडे तत्वावरील घरे योजना आणि मुंबई महानगर प्रदेशातील पश्चिम उप प्रदेशातील गावांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्याकरीता 403 एमएलडी सुर्या पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत सुर्या धरणाचे पाणी जमा करुन त्यावर सुर्या नगर येथे प्रक्रिया करुन ते पाणी 88 किमी लांबीच्या जलवाहिनीद्वारे पुरविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च रु. 1 हजार 611 कोटी रुपये इतका असून प्रकल्पाचे काम यावर्षी सुरु होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याचा राज्य शासनाचा ध्यास आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूदही केली आहे. एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांच्या कामांना गती देऊन या प्रकल्पांच्या सेवा मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना निर्धारित वेळेत उपलब्ध होतील यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीस गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु.पी.एस. मदान, अपर मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, प्रविण दराडे, अश्विनी भिडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post Bottom Ad