नवी दिल्ली - सार्वत्रिक निवडणुकीला अद्याप २ वर्षांचा अवकाश असला तरी; विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेश व उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत यश मिळवणार्या भाजपला पराभूत करण्यासाठी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने यासंदर्भात धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला असून, भाजपनेही याला तोंड देण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेत.
यूपी व उत्तराखंडमधील प्रचंड बहुमतानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या कार्यकर्त्यांना २0१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील पक्षाच्या विजयाजवळ एकही राजकीय पक्ष फिरकता कामा नये. यासाठी आपल्याला या दोन्ही राज्यांतील यशाला एका निश्चित उद्दिष्टापर्यंत पोहोचवावे लागेल, असे शाह यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी २0१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी एकसमान विचारधारा असणार्या राजकीय पक्षांना एकत्र यावे लागेल, असे मत व्यक्त करत; निधर्मी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत 'काँग्रेसला एकट्याच्या बळावर मोदींना पराभूत करता येणार नाही', असे परखड मत व्यक्त केले आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस महाआघाडी स्थापन करण्यासह सर्वच पर्यायांचा गांभीर्याने विचार करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधीच करतील मोदींना पराभूत - काँग्रेस
राहुल गांधी यांचे साधेपणच मोदींना पराभूत करेल, असा दृढ विश्वास काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी व्यक्त केला आहे. यूपीतील पराभवासाठी राहुल गांधी जबाबदार नसल्याचा दावाही त्यांनी याप्रसंगी केला. 'तुम्ही नेतृत्वात बदल करू शकत नाही. नेतृत्व केवळ आमच्यासारख्या लोकांची टीम तयार करते. ही टीमच निवडणुकीतील जय-पराजयासाठी जबाबदार असते', असे ते म्हणाले.