आम्ही भ्रष्टाचाराला साथ देत नाही, आम्हाला पारदर्शक कारभार हवा असे वेळोवेळी वक्तव्य करून भाजपाने शिवसेनेवर भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला. निवडणुकीपूर्वी विविध घोटाळे बाहेर काढत शिवसेनेची गोची केली गेली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाची वाढलेली ताकद बघून जागा वाटपाची मागणी केली. भाजपाच्या मागणी प्रमाणे शिवसेनेला जागा देणे परवडणारे नसल्याने दोन्ही पक्षातील युती तुटली.
मुंबई महापालिकेत दोन्ही पक्ष मिळून मलिदा खात आले आहेत. तरीही भाजपाला सत्तेची हाव सुटल्याने शिवसेनेविरोधात निवडणूक लढवत भाजपाने शिवसेनेइतकेच उमेदवार निवडणून आणले. शिवसेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ उमेदवार निवडून आले. दोन्ही पैकी कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने अपक्षांच्या मदतीने आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
परंतू काँग्रेस ३१, राष्ट्रवादी ९, मनसे ७, समाजवादी ६, एमआयएम २ या पक्षांनी कोणालाही पाठिंबा दिला नाही. कोणीही आपल्या सोबत येणार नसल्याने आणि निवडून आलेल्या पैकी बहुतेक अपक्षांनी शिवसेनेला साथ दिली. भाजपाला आपली सत्ता काही केल्या येत नाही याची जाणीव झाल्याने खुद्द मुख्यमंत्र्यांना भाजपा महापालिकेतील महापौर, उप महापौर, समिती अध्यक्ष, बेस्ट मधील अध्यक्ष पदाची कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसेच विरोधी पक्ष नेते पदही भाजपा घेणार नाही हे सांगावे लागले.
भाजपाने आम्ही पारदर्शक कारभाराच्या बाजूने असून पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करू असे जाहीर केले. ज्या भाजपाने शिवसेनेवर पारदर्शक नसल्याचा, भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला त्याच शिवसेनेचा महापौर बनावा म्हणून भाजपाने पारदर्शकतेचा मुद्दा कचऱ्याच्या कुंडीत टाकून मतदान केले. अपारदर्शक शिवसेनेच्या हातात महापालिकेची सत्ता देऊन भाजपाने राज्यातील शिवसेनेच्या पाठिंब्यावर असलेले आपले सरकार व मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवली आहे.
निवडणुकीपूर्वी एकमेकांवर केलेले आरोप यामुळे भाजपा व शिवसेना दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकत नाव्हते. दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर ज्या मतदारांनी मतदान केले त्याचा घोर अपमान झाला असता. तरीही मतदारांनी दिलेल्या कौलाचा या दोन्ही पक्षांनी विचार केलेला नाही. वर वर मुंबईकरांना आम्ही विरोधात आहोत हे दाखवताना आतून दोघांनी मिळून सत्ता उपभोगण्यात येत आहे. राज्यात आणि आता मुंबई महापालिकेत याचे चित्र दिसत आहे.
मुंबई महापालिकेच्या कोणत्याही निवडणूक लढवणार नाही अशी म्हणवणारी भाजपा आता सेनेबरोबर सेटिंग करून पालिकेतील १७ प्रभाग समित्यामधील सत्ता वाटून घेणार आहे. महापालिकेच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसता आले नसले तरी आता प्रभाग समित्यांमधून भाजपा आणि शिवसेना मांडीला मांडी लावून बसणार आहे. मतदारांना मूर्ख बनवून आता भाजपा सत्तेत सहभागी होत असल्याने भाजपाच्या पारदर्शकतेचा बुरखा मात्र फाटलेला आहे.
पारदर्शक कारभाराच्या पोकळ गप्पा मारणारी भाजपा मतदारांना मूर्ख बनवून गप्प बसलेली नाही. भाजपाने लोकशाही व्यवस्था उलथवून लावली आहे. सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या पक्षाचा महापौर बनल्यास किंवा त्यांनी सत्ता स्थापन केल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला विरोधी पक्ष नेते पद दिले जाते. हे पद घेणार नसल्याचे आधीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
विरोधी पक्ष नेते पद घेतल्यास भाजपाचे आणि मुख्यमंत्र्यांचे हसे होईल या भीतीने नियमानुसार हे पद घेण्यास भाजपा तयार नाही. भाजपाला विरोधी पक्ष नको पद हे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारही बोलत आहेत. मात्र विरोधी पक्ष नेते पद नको हे पालिका चिटणीस विभागाकडे लिहून देण्याची हिम्मत भाजपाकडे नाही. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यावर संसदेत विरोधी पक्ष नेते पदासाठी लागणारी सदस्य संख्या कोणत्याच पक्षाकडे नसल्याने संसदेत विरोधी पक्षनेते पद कोणाला देण्यात आलेले नाही. महापालिकेत असा कोणता नियम नाही. यामुळे भाजपाने विरोधी पक्ष नेते पद घेऊन विरोधात बसावे. अन्यथा भाजपाने आम्हाला हे पद नको हे लेखी द्यायला हवे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्य घटने प्रमाणे भारतात लोकशाही आहे. या लोकशाहीत सत्ताधारी पक्षा प्रमाणे विरोधी पक्षाला देखील महत्व दिले आहे. सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्याचे व त्यांच्या चुका दाखवण्याचे काम विरोधी पक्ष व विरोधी पक्ष नेता करत असतो. याच लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नसलेल्या भाजपाने केंद्रा प्रमाणे मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष नेते पद कुणालाच मिळू नये अशी खेळी खेळली आहे. यासाठी भाजपा स्वतः विरोधी पक्ष नेते पद घेण्यास तयार नाही आणि इतर पक्षाला म्हणजेच काँग्रेसला हे पद मिळू नये म्हणून पद नको असे लेखी देण्यास तयार नाही.
लोकशाहीवर विश्वास नसलेल्या भाजपाकडून लोकशाहीचा खुलेआम खून केला जात आहे. भाजपाकडून लोकशाहीचा खून केला जात असताना गेल्या काही दिवसातील शिवसनेच्या पक्ष प्रमुखांच्या काही वक्तव्यांवरून शिवसेनेला लोकशाही हवी आहे असे दिसत आहे. यामुळे शिवसेना पक्ष प्रमुखांनी आपले आदेश पाळणाऱ्या महापौरांच्या माध्यमातून महापालिकेतील लोकशाही टिकवण्यासाठी आणि भाजपाचा पारदर्शकतेचा बुरखा आणखी फाडण्यासाठी विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय त्वरित घ्यायलाच हवा.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३