आयकर परताव्यासाठी अर्ज भरण्याचे काम आता अधिक सोपे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 March 2017

आयकर परताव्यासाठी अर्ज भरण्याचे काम आता अधिक सोपे



नवी दिल्ली : वेतनधारी आयकरदात्या व्यक्तींना आयकर परताव्यासाठी अर्ज भरण्याचे काम आता अधिक सोपे करण्यात आले असून या सादरीकरणासाठी असलेल्या फॉर्ममध्ये काही कॉलम्स हे सुधारण्यात आले आहेत. त्यामुळे वेतनधारी व्यक्ती व व्याजाचे असणारे उत्पन्न दाखवण्यासाठी अर्जामध्ये कमीत कमी कॉलम्स भरावे लागणार आहेत. आयकर कपातीसाठी असलेले हे विवरण आयटीआर-१ मध्ये असून या विवरणपत्राला 'सहज' असे नाव देण्यात आले आहे.

२0१७-१८ या आर्थिक वर्षासाठी असलेल्या विवरणामध्ये विविध कलमांखाली मिळणारी करसवलत स्पष्ट करणारे विभाग (चॅप्टर ६ ए) आता काढून टाकण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने जे वापरण्यात येत आहे, असेच विभाग येथे ठेवण्यात आले आहेत. सेक्शन ८0 सी, मेडिक्लेम - सेक्शन ८0 डी हे नेहमीचे कॉलम तसेच ठेवण्यात आले आहेत. अन्य विभाग जे करसवलतीसाठी वापरावयाचे असतील त्यांना अन्य शीर्षकाखाली तसा पर्याय निवडून ती बाब नोंद करता येईल. सध्या आयटीआर-१ म्हणजेच सहज या फॉर्ममध्ये १८ विविध कॉलम्स (रकाने) आहेत. यामध्ये सेक्शन ८0 अंतर्गत असलेल्या करकपातीबाबत दावा करता येतो. सेक्शन ८0 सी नुसार १.५ लाख रुपये करकपात करण्यासाठी दावा करता येतो. यामध्ये एलआयसी, पीपीएफ, गृहकर्ज परतावा आदींचा समावेश आहे. सेक्शन ८0 डी नुसार एकूण करपात्र उत्पन्नातून कर कपात करण्याची सुविधा आहे व त्यामध्ये वैद्यकीय विमा हप्त्याचा समावेश आहे. आता या महिनाअखेरीस हे नवे अर्ज अधिसूचित केले जातील. एप्रिलपासूनच करदात्यांनी आपले करपरतावे (रिटर्न्‍स) भरण्याचे काम सुरू करावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे एका आयकर अधिकार्‍याने सांगितले. अधिकाधिक लोकांनी हे रिटर्न्‍स भरावेत, त्यासाठी प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे. एकंदर २९ कोटी पॅनकार्डधारकांपैकी केवळ ६ कोटी पॅनकार्डधारक हे रिटर्न्‍स भरतात. ई-फायलिंगची आयटीआर-१ साठी असणारी सुविधा येत्या १ एप्रिलपासून उपलब्ध होऊ शकेल व ३१ जुलै याअखेरच्या दिवसापर्यंत लोकांना त्याचा लाभ घेता येईल.

Post Bottom Ad