छापील किंमतीपेक्षा अधिक किंमत आकारल्यास कायदेशीर कारवाई करणार - गिरीश बापट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 March 2017

छापील किंमतीपेक्षा अधिक किंमत आकारल्यास कायदेशीर कारवाई करणार - गिरीश बापट

मुंबई दि 30 - हदय शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंट, कॅथेटर, बलून्ससारख्या वैद्यकीय सामग्रीसाठी रुग्णांकडून कमाल विक्री छापील किंमतीपेक्षा अधिक किंमत आकारल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी आज विधान परिषदेत दिले.
हदय शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंट, कॅथेटर, बलून्ससारख्या वैद्यकीय सामग्रीसाठी रुग्णांकडून उत्पादन किंमतीपेक्षा अधिक किंमत आकारत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना महाराष्ट्र विधान परिषद नियम 101 अन्वये विधान परिषद सदस्य संजय दत्त यांनी विधान परिषदेत मांडली होती.

यावेळी बापट म्हणाले की, हदय शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या स्टेंट तसेच आवेष्टीत वस्तुंच्या छापील किंमतीत खाडोखोड केल्याबद्दल तसेच काही रुग्णालयातील इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणे विहित मुदतीत पडताळणी व मुद्रांकन करुन न घेतल्याबद्दल संबंधित रुग्णालयांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच यासंदर्भातील सखोल चौकशी करुन त्यात दोषी आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. दोषी आढळलेल्या व्यक्तीस सात वर्ष शिक्षा आणि दंड स्वरुपात रक्कम आकारण्यात येईल.

केंद्र शासनाने औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, 1940 मधील तरतुदीनुसार स्टेंटस व अन्य उपकरणांचा औषध म्हणून समावेश केला आहे. वैधमापन शास्त्रअधिनियमातील तरतुदींच्या उल्लंघनाच्या संदर्भात तक्रार करावयाची असल्यास वैधमापनशास्त्र यंत्रणेच्या 022-2288666 या दुरध्वनीवर कार्यालयीन वेळेत किंवा dclmms_complaint@yahoo.com या ईमेल किंवा 9869691666 या व्हॉट्सॲप क्रमांकावर ग्राहकास तक्रार दाखल करता येईल,असेही मंत्री श्री. बापट यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad