३३ कोटींच्या दानामुळे २५ हजार गरीब रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयांत उपचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 March 2017

३३ कोटींच्या दानामुळे २५ हजार गरीब रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयांत उपचार



मुंबई (प्रतिनिधी)- रुग्णांवर माफक दरात उपचार करता यावे, यासाठी पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ‘गरीब रुग्ण सहाय्यता निधी’ त दानशूरांनी भरभरून दान टाकले आहे. एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान या निधीत दानशूर दाते व संस्थांकडून एकूण ३३ कोटी ३५ लाख ५५ हजार २२६ रुपये एवढी रक्कम दान स्वरुपात प्राप्त झाली असून या रकमेतून २५ हजार ११७ एवढ्या गरीब रुग्णांवर आर्थिक मदतीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिका प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. दरम्यान दान देणा-या दात्यांना आयकर कलम ‘८० जी’ नुसार आयकरामध्ये सवलत मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शस्त्रक्रिया, औषधोपचार यासारख्या विविध बाबींसाठी आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील गरुजुंना दिलासा मिळावा, या उद्देशाने सन १९२६ पासून पालिकेच्या रुग्णालयांमधून `गरीब रुग्ण सहाय्यता निधी’ ची सुरूवात झाली. पालिकेची चार प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यात परळ येथील के. इ. एम. रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बा. य. ल. नायर रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, जुहू-विलेपार्ले परिसरातील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय यांचा समावेश आहे. या चारही रुग्णालयातील ‘गरीब रुग्ण सहाय्यता निधी’त एकूण ३२ कोटी ६९ लाख ७८ हजार १३६ रुपये एवढी रक्कम दान स्वरुपात प्राप्त झाली आहे. या रकमेतून २१ हजार ४७१ रुग्णांना मदत करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. सुपे यांनी दिली आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित ५ विशेष रुग्णालये, २८ प्रसूतिगृहे व १७५ दवाखाने आहेत. यातील ‘गरीब रुग्ण सहाय्यता निधी’ मध्ये दानशूर व्यक्ती व संस्थांनी एकूण २८ लाख ३३ हजार ९०९ रुपये एवढा रक्कम दान म्हणून दिली आहे. या रकमेतून १ हजार ९५६ गरजू रुग्णांना मदत करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे.

प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालये) यांच्या अखत्यारित एकूण १६ रुग्णालये आहेत. या रुग्णालयातील ‘गरीब रुग्ण सहाय्यता निधी’ मध्ये गेल्या ११ महिन्यात ३७ लाख ४३ हजार १८१ रुपये एवढी रक्कम मिळाली आहे. यामधून एकूण १ हजार ६९० रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालये) डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली आहे.

रुग्णाची आर्थिक परिस्थिती पाहूनच दिली जाते मदत - संबंधित गरजु व्यक्तींनाच या निधी मधून अर्थसहाय्य मिळावे, यासाठी अर्जदार रुग्णाने वा त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयातील `वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता’ (Medical Social Worker) किंवा संबंधित `वैद्यकीय अधिकारी’ (Medical Officer) यांच्याकडे संपर्क साधणे आवश्यक असते. सदर अर्ज प्राप्त झाल्यावर संबंधित नियमांच्या अधीन राहून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची छाननी केली जाते. सदर रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीची खातरजमा झाल्यानंतर व इतर कोणत्याही योजनेमधून किंवा सेवाभावी संस्थांद्वारे सदर रुग्णास मदत मिळू शकत नाही, याचीही खातरजमा झाल्यावर सदर रुग्णास `PBCF’ मधून अर्थसहाय्य देण्यात येते.

Post Bottom Ad