उच्च पदस्थ अधिका-यांच्या मैत्री इमारतीत 29 मजले अनधिकृत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 March 2017

उच्च पदस्थ अधिका-यांच्या मैत्री इमारतीत 29 मजले अनधिकृत

मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईतील कलिना येथील मैत्री इमारतीतील 29 मजले अनधिकृत असून या इमारतीत मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव प्रवीण दराडे, बिपिन श्रीमाळी, हर्षदीप कांबळे, सुधीर ठाकरे, अभिमन्यू काळे, दिपक कपूर, राजेश नार्वेकर, संजय यादव, जवाहर सिंग असे 84 सदस्यांत उच्च पदस्थ अधिका-यांचा समावेश असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केली आहे. मैत्रीचे अनधिकृत मजले मुंबई महापालिका तोडणार की नियमांचा हवाला देत अधिकृत करणार असा सवाल विचारत गलगली यांनी म्हाडा अधिकारी आणि इमारतीचे बांधकाम करणारे कंत्राटदार शिर्के यांचे बिंग फोडले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी 21 ऑक्टोबर 2016 रोजी पालिका आणि म्हाडा प्रशासनाकडून सांताक्रूझ पूर्व कलिना येथील मैत्री इमारतीची माहिती मागितली होती. म्हाडाने 4 फेब्रुवारी 2010 रोजी मेसर्स बी.जी.शिर्के यास 13 मजली इमारतीत मध्यम उत्पन्न गटातंर्गत 1279.52 चौरस फुटांचे 150 तर उच्च उत्पन्न गटातंर्गत 1310.52 चौरस फुटांचे 76 सदनिका अशा 226 सदनिका 36.50 कोटीत बांधण्याचे काम दिले. म्हाडाकडून मैत्री सहकारी गृहनिर्माण संस्थेतील निर्धारित 76 सदस्यांव्यतिरिक्त उर्वरित तसेच शासनाने मंजूर केलेल्या सदस्यांकरिता 15 सदनिका उपलब्ध करून देण्यास मंजूरी देण्यात आली. विंग ए साठी 3 तर विंग बी आणि सी साठी 2 माळयाची परवानगी असताना मेसर्स शिर्के या कंत्राटदाराने 12 माळयाचे बांधकाम केले आणि त्यानंतर अनधिकृत माळे अधिकृत करण्याची विनंती पालिकेस केली.
दरम्यान, अनिल गलगली यांनी अनधिकृत मजले तोडण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पाठविलेल्या पत्रात करत मेसर्स शिर्के आणि 84 सदस्यांवर एमआरटीपी (MRTP) अंतर्गत कार्यवाहीची मागणी केली आहे. इमारतीचा नियमितकरणाचा प्रस्ताव म्हाडाचे कार्यकारी अभियंता यांजकडून प्राप्त झाला असून आयुक्तांची मंजुरी प्राप्त करण्याकरीता सादर केला आहे. त्यामुळे आयुक्तांचे आदेश प्रतिक्षेत आहे, असे गलगली यांस इमारत प्रस्ताव विशेष कक्षाचे उप --प्रमुख अभियंता यांनी कळविले आहे. गलगली यांनी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन मुंबईतील अन्य अनधिकृत बांधकामावर जशी कारवाई केली जाते, तशीच कारवाई 'मैत्री' च्या अनधिकृत मजल्यांवरही करावी अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

84 सदस्यांत राज्याचे विविध खात्यांचे अधिकारी----मुख्यमंत्री सचिवालयापासून उपमुख्यमंत्री कार्यालय, म्हाडा, एसआरए, गृहनिर्माण, ग्रामविकास, नगरविकास, सहकार, महसूल, भ्रष्टाचार निरोधक ब्युरो, सार्वजनिक आरोग्य , पालिका, सिडको, शिक्षण, जलसंपदा, कृषी, महिला व बालविकास, उद्योग, माहिती व तंत्रज्ञान, पोलीस, विक्रीकर, परिवहन अशा प्रत्येक खात्याच्या अधिकारी आणि कर्मचा-यांची वर्णी लागली असून 4 प्रर्वतकामध्ये मुंबई मंडळाचे सहमुख्य अधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस उपायुक्त सुनील रामानंद, गृहनिर्माण राज्यमंत्र्यांचे खाजगी सचिव कैलास पगारे आणि गृहनिर्माण विभागाचे उपसचिव व अप्पर जिल्हाधिकारी दिलीप शिंदे आहेत तर मुख्य प्रर्वतक झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाचे अप्पर जिल्हाधिकारी ए.एम.वझरकर आहेत.

Post Bottom Ad