कर्जमाफीची घोषणा न झाल्याने लाखो शेतकऱ्यांची घोर निराशा : धनंजय मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2017

कर्जमाफीची घोषणा न झाल्याने लाखो शेतकऱ्यांची घोर निराशा : धनंजय मुंडे


राज्याला आर्थिक संकटात लोटणारा 'अनर्थ'संकल्पमुंबई, दि. 18 :- अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने दुष्काळानं पिडीत लाखो शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. नोटाबंदीमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असताना अर्थसंकल्पात नियोजनाचा अभाव दिसत आहे. घोषणांचा सुकाळ व स्वप्नांचे इमले असलेल्या या अर्थसंकल्पाने राज्याला आर्थिक संकटात, अराजकतेच्या खाईत लोटलं आहे. हा अर्थसंकल्प नाही तर 'अनर्थ'संकल्प आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. 
विधीमंडळात आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची आशा होती, ती आशा फोल ठरली आहे. राज्याचा विकासदर वाढत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे, परंतु विकासदर निश्चितीचे निकष बदलून सरकारने जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. राज्यातील पिकांची हेक्टरी उत्पादकता घटत असताना सरकार उत्पादनवाढीचा करत असलेला दावा फोल आहे. गेल्यावर्षी शेतीकेंद्रीत अर्थसंकल्प सादर झाला व राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या, हे सरकारच्या अर्थसंकल्पाचे फलित आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी अर्थसंकल्पात कोणताही दिलासा नाही. यातून सरकारची असंवेदनशीलता दिसते, असे मुंडे म्हणाले.

नोटाबंदीनंतर ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, मध्यमवर्गीय माणूस सरकारकडे आशेने पाहत होता, परंतु सरकारने या सगळ्यांची निराशा केली आहे. सिंचनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही, सिंचनक्षेत्र वाढवण्यात अपयशी ठरल्याबद्दल राज्यपाल महोदयांनी सरकारवर टीका केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मेट्रो, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी व इतर नागरी प्रकल्पांवर मोठा खर्च दाखवला आहे, परंतू तीथेही विकासाची गती धीमी आहे, असे मुंडे यांनी सांगितले.

गेल्या अर्थसंकल्पातील तरतूदीच्या केवळ 46 टक्के निधी हे सरकार खर्च करु शकले आहे. जनतेच्या हिताची काळजी घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल न्यायालयानेही सरकारवर वारंवार ताशेरे ओढल्याकडेही मुंडे यांनी त्यांचे लक्ष वेधले. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद नसल्याबद्दल त्यांनी खेद व संताप व्यक्त केला.

Post Bottom Ad