स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन पथक असणारे मुंबई देशातील पहिले शहर ठरणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 March 2017

स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन पथक असणारे मुंबई देशातील पहिले शहर ठरणार



एनडीआरएफ'च्या धर्तीवर 'सीडीआरएफ' च्या स्थापनेस आयुक्तांची मंजुरी - मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबई शहराची लोकसंख्या आणि आपत्ती संभाव्यता लक्षात घेऊन मुंबई महानगरासाठी स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन पथक उभारण्यास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंजुरी दिली. एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन पथक असणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे.

भूकंप, पूर, इमारत कोसळणे यासारख्या आपत्तीच्या वेळी धावून येत अनेकांचे जीव वाचवणारे 'एनडीआरएफ' चे जवान म्हणजे अनेकांसाठी देवदूतच ठरतात. मात्र, भौगोलिक परिस्थिती आणि मर्यादा लक्षात घेत 'एनडीआरएफ' चे जवानांना प्रत्येक आपत्तीच्या वेळी तात्काळ पोहोचण्यावरही मर्यादा येऊ शकतात. तसेच मुंबई शहराची लोकसंख्या आणि आपत्ती संभाव्यता लक्षात घेऊन मुंबई महानगरासाठी स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन पथक उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नुकतीच मंजूरी दिली. सध्या केंद्र शासनाच्या स्तरावर 'राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक' (एनडीआरएफ) कार्यरत आहे. आता याच 'एनडीआरएफ' च्या धर्तीवर खास मुंबईसाठी 'शहर आपत्ती व्यवस्थापन पथक' स्थापन करण्यात येणार आहे.

त्यामुळे स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन पथक असणारे मुंबई हे देशातील पहिले शहर अशी नोंद होणार आहे पालिका क्षेत्र हे अनेक प्रकारच्या आपत्तींसाठी संवेदनशील मानले जाते. यामुळे योग्य आपत्ती व्यवस्थापन हा महापालिकेसाठी अत्यंत आव्हानात्मक आहे. याकरीता महापालिकेने सन १९९९ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला होता. या कक्षाने आजवर विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींमध्ये मोलाची कामगिरी बजावल्याने आजही या कक्षाचा देशभरात नावलौकिक आहे. हा कक्ष आता अधिक सक्षम व प्रभावी आणि कोणत्याही आपत्तीदरम्यान तात्काळ व गुणवत्तापूर्ण आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने 'शहर आपत्ती व्यवस्थापन पथक' अर्थात 'सीडीआरएफ' ची स्थापना करण्यात येणार आहे. या पथकामध्ये महापालिकेच्या सुरक्षा दलात गेल्याच वर्षी भर्ती झालेल्या २०० जवानांचा समावेश करण्यात येणार आहे. या सर्व जवानांना केंद्र सरकारच्या अखत्यारितील 'एनडीआरएफ' द्वारे तसेच भारतीय सैन्य दलाद्वारे देखील विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये रासायनिक, जैविक, अणु नैसर्गिक वा आण्विक आपत्ती, वैद्यकीय प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण, कोसळलेल्या बांधकामात अडकलेल्या लोकांची सुटका करणे, पुराच्या पाण्यातून लोकांना वाचविणे, उंच इमारतींमधील आपत्ती प्रसंगी लोकांचा बचाव करणे यासारख्या बाबींचा समावेश असणार आहे. तसेच भूकंप काळात मदत व पुनर्वसन करणे यासह विविध नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तींमध्ये करावयाच्या कामांबाबतही या जवानांना योग्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर कसा करावा? याचेही प्रशिक्षण या जवानांना दिले जाणार आहे. या २०० जवानांची महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागवार नेमणूक करण्यात येणार आहे. जेणेकरुन भविष्यातील संभाव्य आपत्तीच्या वेळी हे जवान आपत्कालिन परिस्थितीच्या ठिकाणी त्वरीत पोहचणे सुकर होणार आहे.शहर आपत्ती व्यवस्थापन पथकासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यावश्यक अशी अत्याधुनिक यंत्रसामुग्री देखील घेण्यात येणार आहे. यामध्ये पोर्टेबल ब्रीदिंग उपकरण, पडलेल्या भिंती - खांब इत्यादी उचलण्यासाठी इनफ्लेटेबल टॉवर, एअरलिफ्टींग बॅग, पाणी बाहेर फेकणारे तरंगते पंप, आपत्तीमध्ये अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी दृकश्राव्य सुविधा असणारे अत्याधुनिक व्हिक्टीम लोकेटर, एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये कुणी व्यक्ती जिवंत आहे का? याचा शोध घेणारे अत्याधुनिक लाईफ डिटेक्टर यंत्र, पाणबुड्यासाठीचा संच, पाण्याखाली संवाद साधण्याचे यंत्र यासारख्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा समावेश असणार आहे. ही यंत्रसामुग्री घेताना मुंबई अग्निशमन दलाकडे नसणारी यंत्रसामुग्री प्राधान्याने घेण्याचे प्रस्तावित केले जाणार आहे.

पालिकेच्या प्रस्तावित 'शहर आपत्ती व्यवस्थापन पथक' यातील २०० जवानांसाठी विशेष प्रकारचे 'रिफ्लेक्टर जॅकेट' व आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुयोग्य 'हेल्मेट' देखील घेण्यात येणार आहेत. या पथकाकडे सोपविण्यात येणा-या जबाबदा-यांमध्ये प्रामुख्याने प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापनात सहाय्यकारी व सक्रिय भूमिका अदा करणे, मदत व पुनर्वसन विषयक कामे पार पाडणे, नियमित आणि कठोर प्रशिक्षण घेणे व त्याबाबतचा सराव करणे, जनजागृती विषयक कामे करणे यासह विविध यंत्रणांबरोबर आपत्ती व्यवस्थापन विषयक रंगीत तालमींमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणे यासारख्या बाबींचा समावेश असणार आहे.

'शहर आपत्ती व्यवस्थापन पथक' हे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) यांच्या अखत्यारित असणार आहे. शांततेच्या काळात या पथकातील प्रशिक्षित कर्मचारी हे महापालिकेच्या प्रमुख सुरक्षा अधिकारी यांच्या अखत्यारित कार्यरत असतील. मात्र, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या कर्मचा-यांचा ताबा हा लगेचच महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख अधिका-यांकडे वर्ग होणार आहे.

शहर आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान हे शांततेच्या काळात महापालिकेच्या सुरक्षा खात्याच्या गणवेष परिधान करतील, तर आपत्कालीन परिस्थितीच्या काळात 'सीडीआरएफ' साठी असलेला वैशिष्ट्यपूर्ण गणवेष परिधान करतील. विशेष म्हणजे प्रस्तावित शहर आपत्ती व्यवस्थापन पथकामध्ये कार्यरत असणारे २०० जवान हे महापालिकेच्या सुरक्षा खात्याचेच कर्मचारी असल्याने याबाबत महापालिकेवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही. बृहन्मुंबईसाठी प्रस्तावित करण्यात आलेले 'शहर आपत्ती व्यवस्थापन पथक' कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Post Bottom Ad