पालिका निवडणुकीच्या काळात पालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी निवडणूक विषयक कार्यवाहीत व्यस्त असल्याने याचा गैरफायदा घेत वर्सेावा गावठाण परिसरात पाच ठिकाणी अनधिकृत इमारती बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले. एकूण सुमारे १० हजार चौरस फूट जागा असलेल्या पाच वेगवेगळ्या भूखंडांवर या इमारती बांधण्यात आल्या होत्या. ही बाब लक्षात येताच या इमारतींना पालिकेच्या के/पश्चिम विभागाद्वारे नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर पालिकेच्या नियम व पद्धतींनुसार या इमारतींवरील तोडकाम कारवाई सुरु करण्यात आली आहे.
वर्सेावा गावठाण परिसरात असलेल्या या इमारतींपर्यंत पोहचण्यासाठी असणारे मार्ग अत्यंत चिंचोळे असल्याने व या इमारतींपर्यंत जेसीबी सारखी यंत्रसामुग्री पोहचणे अशक्य असल्याने या इमारतींवर कारवाई करणे हे एक आव्हानच होते पालिकेच्या के/पश्चिम विभागातील कामगार, कर्मचारी व अधिकारी यांनी जुन्या पद्धतीनुसार मानवीयरित्या तोडकाम कारवाई सुरु केली आहे. यामध्ये घण, हातोडा, कुदळ, पहार, गॅस कटर यासारख्या अवजारांचा वापर करुन ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी पालिकेचे २५ कामगार, कर्मचारी व अधिकारी हे मुंबई पोलीस दलाच्या सहकार्याने ही कारवाई पार पाडीत आहेत, अशीही माहिती प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.