महापालिकेच्या खर्चाने अधिकार्‍यांच्या परदेश अभ्यास दौर्‍यांना चाप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2017

महापालिकेच्या खर्चाने अधिकार्‍यांच्या परदेश अभ्यास दौर्‍यांना चाप


मुंबई : मुंबई महापालिकेच्या खर्चाने विविध प्रकल्पांची अथवा मालाची तपासणी करण्यासाठी परेदश दौर्‍यांवर जाण्याकरता उत्सुक असलेल्या पालिकेच्या अधिकार्‍यांना आयुक्त अजोय मेहता यांनी चाप लावला आहे. परदेशात जाणार्‍या अधिकार्‍यांसाठी आयुक्तांनी सुधारित नियम लागू केले आहेत.
विविध प्रकल्पांच्या निविदांमध्ये अनेकदा परदेशातील संस्था देखील सहभागी होत असतात. परदेशातील या संस्थांच्या प्रकल्पाची अथवा मालाची तपासणी करण्यासाठी पालिका अधिकार्‍यांना परदेशात पाठवण्यासंबंधीच्या अटींचा उल्लेख सरसकट सर्व निविदा प्रपत्रामध्ये यापूर्वी करण्यात येत असे. मात्र, आता याबाबत मेहता यांच्या आदेशानुसार सुधारित आदेश नुकतेच लागू केले आहेत. या सुधारित परिपत्रकानुसार येथून पुढे अत्यावश्यक असेल तेव्हाच संबंधित अतिरिक्त पालिका आयुक्तांच्या मंजुरीने तपासणीच्या अटींचा समावेश निविदा प्रपत्रामध्ये करता येणार आहे. पालिकेच्या अनेक मोठय़ा प्रकल्प कामांच्या निविदा प्रक्रियांमध्ये परदेशातील संस्था सहभागी होतात. या अनुषंगाने परदेशातील कंत्राटदारांच्या 'प्लान्ट', मशिनरीची वा संबंधित उत्पादन प्रत्यक्षात पाठविण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी पालिकेच्या अधिकार्‍यांना परदेशात जावे लागू शकते. यामुळे यापूर्वीच्या बहुतांश मोठय़ा निविदेच्या अटी व शर्तींमध्येच परदेश दौर्‍यासंबंधीच्या अटी व शर्तींचा समावेश असे. मात्र, आता त्यात सुधारणा केली आहे. यानुसार निविदाविषयक अटी व शर्तींमध्ये परदेश दौर्‍याच्या अटीचा समावेश न करण्याचे आदेश बजावले आहेत. मात्र, काही विशिष्ट स्वरूपाच्या कामांबाबत परदेश दौर्‍याची बाब अतिशय आवश्यक असेल तर संबंधित अतिरिक्त आयुक्तांच्या पूर्वपरवानगीनेच तसा उल्लेख निविदा प्रपत्रातील अटी व शर्तींमध्ये करता येणार आहे.

Post Bottom Ad