मुंबई (प्रतिनिधी) - बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेचा आणि बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प एकत्रित करून तो पालिकेच्या स्थायी समितीला सादर करण्याची सूचना पालिकेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी बेस्टसंबंधी संपन्न झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत केली. जाधव यांच्या मागणीला काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनीही पाठिंबा दिला आहे.
मुंबई पालिका आणि बेस्ट उपक्रमाचा दरवर्षीचा अर्थसंकल्प स्वतंत्र मांडण्याची बर्याच वर्षांपासूनची प्रथा आहे. पालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त स्थायी समिती अध्यक्षांना आणि बेस्टचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक बेस्ट समितीला सादर करतात. बेस्ट समितीने अर्थसंकल्प संमत केल्यानंतर तो पालिकेच्या स्थायी समितीला सादर होतो. स्थायी समितीने मंजुरी दिली की तो पालिकेच्या महासभेत संमतीसाठी मांडला जातो. महासभेने मंजुरी दिल्यानंतर तो पुन्हा बेस्ट समितीला माहितीसाठी सादर करण्याची जुनी कार्यपद्धती आहे.
बेस्ट उपक्रम/समिती ही मुंबई महापालिकेचेच स्वतंत्र अंग असली तरी, बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित करून तो स्थायी समितीला एकत्रित सादर करण्याची सूचना यशवंत जाधव यांनी विशेष बैठकीत मांडली. काँग्रेस पक्षाचे पालिकेतील गटनेते आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष रवी राजा यांनीही ती उचलून धरली. 'ही सूचना अमलात आणल्यास बेस्ट उपक्रम मोठय़ा आर्थिक गर्तेतून बाहेर येईल. ही सूचना अमलात आणण्याचा निर्णय घेण्याआधी पालिकेच्या अधिनियमांनुसार संबंधित अनेक कायद्यांमध्ये बदल करावे लागतील. ते बदल झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करून तो पालिकेच्या महासभेत सर्व नगरसेवकांच्या मंजुरीसाठी मांडून त्यांची परवानगी मिळवावी लागेल. महासभेची संमती मिळाल्यानंतर मंजूर झालेला प्रस्ताव राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. सरकारने संमती दिल्यानंतरच पालिकेचा आणि बेस्ट उपक्रमाचा एकत्रित अर्थसंकल्प मांडता येईल,