मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट प्रशासनाचे आर्थिक कंबरडे तुटले असल्याने मार्चचा अर्धा महिना संपला तरी कर्मचाऱ्यांच्या खात्यात अद्याप पगार जमा झालेला नाही. कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत़.
मुंबई महानगर पालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्टवर ४ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. बेस्टच्या उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त आहे. सत्ताधाऱ्यांच्या आमी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बेस्टचे ४३ लाख असलेले प्रवाशी २९ लाख झाले आहेत. यामुळे बेस्टकडे दररोज येणारी रक्कमही कमी झाली आहे. बेस्टला मातृ संस्था असलेल्या मुंबई महानगर पालिकेने १६०० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. या कर्जावर दरमहा १० टक्के व्याज घेतले जात आहे. कर्जफेडीचा एखादा हफ्ता चुकल्यास बेस्टकडून अधिक टक्क्याने पैसे वसूल केले जात आहेत. बेस्टची आर्थिक परिस्थिती पाहून इतर बँका बेस्टला कर्ज देण्यास पुढे येत नाहीत. ज्या बँकांनी कर्ज दिले आहे त्या बँकांचे हफ्ते फेडल्यावर व रोजच्या तिकीट, पास विक्रीमधून येणाऱ्या पैशांची जुळवा जुळव करून कर्मचाऱ्यांचा पगार दिला जात आहे. दर महिन्याला वेळेवर पगार मिळत नसला तरी १० तारखे पर्यंत पगार मिळत होता. मात्र आता १३ तारीख उलटून गेली तरी पगार झाला नसल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत.