नवी दिल्ली : नवे आयकर विवरणपत्र भरताना नोटबंदीच्या काळात बँकेत जमा करण्यात आलेल्या रकमेचा तपशील द्यावा लागणार आहे. नवे विवरणपत्र २0१७-१८ साली उपलब्ध असेल. कर विभागात मागील वर्षी ८ नोव्हेंबर ते ३0 डिसेंबर या नोटबंदीच्या काळात एखादी व्यक्ती किंवा संस्थेकडून बँकेत जमा करण्यात आलेल्या रकमेची माहिती देण्यासाठी एक नवा रकाना तयार करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवा रकाना हा पगारदार व्यक्तींसाठी आयटीआर-१ किंवा 'सहज' अर्जही जोडण्यात येणार आहे. प्राप्तीकर विभागाने नोटबंदीच्या काळात अघोषित संपत्तीची माहिती देण्यासाठी 'ऑपरेशन क्लीन मनी' आणि 'प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना' (पीएमजीकेवाय) संधी दिली होती. आता विवरणपत्राच्या नव्या रकान्याच्या माध्यमातून बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटांसंबंधी माहिती घेण्यात येणार आहे. नोटबंदीच्या काळात किती रक्कम भरण्यात आली होती, हे या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रय▪केला जाणार आहे. ज्यांनी कमी रक्कम भरली आहे, त्यांना नोटीस बजावण्यात आली नसल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. नव्या विवरण पत्रात आधार क्रमांक देण्यासाठीही रकाना असणार आहे. गतवर्षी आधार क्रमांक देणे ऐच्छिक होते. या वर्षी मात्र बंधनकारक करण्यात आले आहे. आधारच्या वापरामुळे विवरणपत्राचे ई-व्हेरिफिकेशन जारी राहते, असेही या अधिकार्याने म्हटले. आयटीआर-१ किंवा 'सहज' अर्जाची रचना करदात्यांसाठी सोपी बनवली असल्याचे या अधिकार्याने सांगितले. यामध्ये सर्व वजावट, संपत्ती आणि देणे, याबाबत माहिती भरण्यासाठी सर्व रकाने एकत्रित करण्यात आले आहेत. आयटीआर अर्ज १ एप्रिलपर्यंत जारी होण्याची शक्यता आहे.