शिवसेनेने जाहीर केलेला "वचननामा' हा "दिशाभूलनामा ' - सचिन अहिर - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2017

demo-image

शिवसेनेने जाहीर केलेला "वचननामा' हा "दिशाभूलनामा ' - सचिन अहिर

.com/blogger_img_proxy/
मुंबई 23 Jan 2017 -  
शिवसेनेने जाहीर केलेला "वचननामा' हा "दिशाभूलनामा' असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. तसेच "जे बोलतो, ते करून दाखवतो'या सेनेच्या जाहीरनाम्यातील दाव्याचीही त्यांनी यावेळी खिल्ली उडवली. "जे बोलतो, पाच वर्षांनंतरही पुन्हा तेच बोलतो' असे वर्णन यंदाचा शिवसेनेचा जाहीरनामा पाहता करावे लागेल, असा टोलाही त्यांनी हाणाला. गेल्या पंधरा वर्षांच्या जाहीरनाम्यात जी आश्वासने शिवसेने दिली होती, त्याच आश्वासनांची पुनरावृत्ती यंदाच्या जाहीरनाम्यातही करण्यात आल्याचे सांगत ही मुंबईकरांची दिशाभूल असल्याचे अहिर म्हणाले.
मोठा गाजावाजा करून शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात गेल्या वेळच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचाच पाऊस आहे. गेल्या महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही शिवसेनेने पाच वर्षांत मुंबई संपुर्ण खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. यंदाच्या जाहीरनाम्यातही खड्डे मुक्तीचेच आश्वासन देण्यात आले आहे,याकडे लक्ष वेधत मा. अहिर म्हणाले की, इतरही अनेक आश्वासनांमध्ये शिवसेनेने अशीच चापलुसी केली आहे. बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजनेद्वारे महापालिका रुग्णालयातील आरोग्य सेवा सर्व रुग्णांना मोफत देणार, या शिवसेनेच्या आश्वासनाबाबत हसावे की रडावे हेच कळत नाही. कारण महापालिका असो किंवा राज्य सरकारच्या ताब्यातील रुग्णालये असो, तिथे आरोग्यसेवा आताही मोफतच दिली जाते. मग नव्याने मोफत आरोग्य सुविधा देण्याचे प्रयोजन काय, असा सवाल त्यांनी केला. तसेच मुंबईच्या पुर्व किनाऱ्यावर पर्यटन क्षेत्र विकसित करणार, असे आणखी एक आश्वासन सेनेने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. मात्र मुंबईच्या पुर्व किनाऱ्यावरील बहुतांश जागा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची आहे. मग तिथे पर्यटन क्षेत्रे विकसित कशी करणार याचा खुलासा सेनेने करावा, असे आव्हानही अहिर यांनी दिले.

या शिवाय मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मैदाने उभारण्याचेही आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. मात्र फार पुर्वीपासूनच दत्तक धोरणाच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी उपलब्ध असलेली मैदानेच गिळंकृत करून त्यांचा खाजगी वापर सुरू केला आहे, त्याचे काय?असा सवालही त्यांनी केला. तर शिक्षणाबाबतही सेनेने आपल्या जाहीरनाम्यात ई वाचनालय, कौशल्य विकास प्रशिक्षण, आत्मरक्षण प्रशिक्षण, संगीत आकादमी यासारखी भरमसाट आश्वासने दिली आहेत. नव्या गोष्टींना आमचा विरोध नाही. मात्र अगोदर महापालिका शाळांमधील मुलांना गणवेश आणि आवश्यक शैक्षणिक साहित्याचा नीट पुरवठा करा,मगच मोठी आश्वासने द्या, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
सेनेच्या जाहीरनाम्यात देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. त्याबद्दल बोलताना मा. अहिर म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने देवनारच्या मुद्द्यावरून महापालिकेला वारंवार फटकारले आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आगी लागून अासपासच्या भागातील लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरीही हे पंधरा वर्षांपासून कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्यासाठी मुहूर्त शोधत आहेत. हा प्रश्न केव्हा मार्गी लावणार, याबाबत मात्र नेमकेपणाने काहीच भाष्य शिवसेनेचे नेतृत्व का करत नाही, असा सवाल करत शेवटी मुंबईकरांची दर पाच वर्षांनंतर दिशाभूल करणाऱ्यांच्या या दिशाभूलनाम्याला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले. तसेच या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचण्याची हीच वेळ असल्याचेही ते म्हणाले.

Post Bottom Ad

Pages