पत्रकारांनी सामाजिक भान जपण्यास प्राधान्य द्यावे ! - राही भिडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 January 2017

पत्रकारांनी सामाजिक भान जपण्यास प्राधान्य द्यावे ! - राही भिडे

सांगली : स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीय वृत्तपत्रसृष्टीला गौरवशाली इतिहास आहे. जागतिकीकरणाच्या धोरणानंतर सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. यास वृत्तपत्र व्यवसायदेखील अपवाद नाही. अशी परिस्थिती असली तरीही प्रबोधनाचा वसा घेऊन वाटचाल करणार्‍या पत्रकारांनी सामाजिक भान जपण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत 'पुण्य नगरी'च्या मुख्य संपादक राही भिडे यांनी व्यक्त केले.
जिल्हा माहिती कार्यालय आणि समाज कल्याण विभागाच्या वतीने पत्रकार व अँट्रॉसिटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 'सामाजिक सुधारणा व पत्रकारिता' या विषयावर त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, सचिन कवले, राधाकिसन देवढे उपस्थित होते.

राही भिडे म्हणाल्या, आजकाल समाजात सौहार्द राहिले नसून जाती बळकट होत आहेत. समाजसुधारणेस हातभार लावण्याचे कार्य पत्रकारांचे आहे, यात संशय नाही. पत्रकारांनी चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचे धाडस दाखवणे गरजेचे आहे. योग्य शब्दात टीका करण्याचा व समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे व्रत जोपासले पाहिजे. उडदामाजी काळे गोरे याप्रमाणे वृत्तपत्र क्षेत्रात काही चुकीच्या प्रवृत्ती शिरल्या असल्याचे मान्य केले तरीही सर्वच पत्रकारांना एकाच तराजूत तोलणे योग्य नाही. मात्र प्रत्येक पत्रकाराने आपण करीत असलेल्या कार्याचे आत्मपरीक्षण करून त्यामध्ये अधिकाधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. समाज एकसंध ठेवायचा असेल तर पूर्वीप्रमाणेच या काळातही वृत्तपत्रांनी मोलाची भूमिका बजावली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

राही भिडे म्हणाल्या, पूर्वीच्या काळी वृत्तपत्रांचा खप हा र्मयादित होता. २४ तास बातम्या प्रक्षेपित करणार्‍या वाहिन्या आल्यानंतर वृत्तपत्रांचे काय होणार, असा प्रश्न काहींना पडला होता. मात्र सकाळचा चहा आणि वृत्तपत्र हे समीकरण कित्येकांच्या मनात पक्के आहे. त्याला धक्का लागणे अवघड आहे. बहुजनवर्ग सुशिक्षित झाल्याने स्वातंत्र्योत्तर कालखंडात क्रमाक्रमाने वृत्तपत्रांच्या खपाने लाखोंचे आकडे ओलांडले आहेत. भविष्यकाळात देखील खपांच्या क्रमवारीत वाढच होईल.

या वेळी समाजात विकृती पसरवणारी काही माणसे असतात. त्यांना पायबंद घालण्याचे कार्य केवळ पत्रकारांनी नव्हे तर समाजानेच हाती घेतले पाहिजे, असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले. कार्यशाळेत जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी पत्रकारांसाठी कायदे व अँट्रॉसिटी कायदा, उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी अत्याचारग्रस्त पीडितांचे पुनर्वसन व पत्रकारांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले. आभार समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी मानले. सूत्रसंचालन ए. के. पाटील यांनी केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक राजू मोरे, पत्रकार शिवराज काटकर, हरिश यमगर, रवींद्र कांबळे, कुलदीप देवकुळे, प्रताप मेटकरी यांनी मनोगत व्यक्त केले.

Post Bottom Ad