निवडणूक म्हटली कि मतदारांना विविध आमिषे दाखवली जातात. उमेदवार आपण निवडणुकीमध्ये जिंकावे म्हणून मतदारांना पैसे, भांडी, कपडे तसेच विविध सामाजिक, क्रीडा मंडळांना पैशांची पाकिटे वाटली जातात. अश्या आमिषाला बळी पडणारे मतदार आणि संघटना मग त्या उमेदवारासाठी कामी करून पैश्यांच्या जोरावर निवडणुकीमध्ये निवडून आणतात. असे प्रकार निवडणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणात होत असतात.
असे प्रकार करणाऱ्या काही लोकांना अटकही होते. मिडियामध्ये बातमी येते परंतू पुढे काय होते हे मतदारांना काही कळत नाही. एखादी निवडणूक संपल्यानंतर निवडणूक आयोग किती रक्कम पकडली याची माहिती जाहीर करते. परंतू असे प्रकार करणाऱ्या लोकांवर कोणती कारवाई होती अशी माहिती मतदारांना मिळत नाही. अशी माहिती मिळाल्यास पुढील निवडणुकीमध्ये मतदार स्वतःहून अश्या लोकांना आपल्या पासून लांब ठेवू शकतात.
महाराष्ट्रात नुकत्याच १० महापालिकांच्या, २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समितींच्या निवडणुका होत आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे.एस. सहारिया हे अश्या निवडणूक होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेत आहेत. नुकतीच मुंबई महापालिका निवडणुकीची आढावा बैठक संपन्न झाली. पोलीस अतिरिक्त आयुक्त देवेन भारती, निवडणूक आयोगाचे सचिव चंद्रशेखर चन्ने, पालिका आयुक्त अजोय मेहता तसेच बँकिंग अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सहारिया यांनी केलेल्या घोषणेमुळे अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
मतदारांना निर्भयपणे मतदान करणे शक्य व्हावे यासाठी मुंबईतील संवेदनशील मतदार संघांची यादी तयार करण्यात येत आहे. सर्व राजकीय पक्षांना समान संधी उपलब्ध व्हावी यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी प्रयत्नशील राहणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले. उमेदवारांच्या प्रत्येक दिवसाच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात येणार आहे. उमेदवारांकडून जे प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे ते वृत्तपत्रातून जाहीर केले जाणार असून त्याचबरोबर मतदान केंद्राबाहेरही त्याच्या प्रति जनतेच्या माहितीसाठी लावण्यात येणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांना विविध प्रलोभने दाखवून गैरप्रकार होत असतात. हे थांबविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून यावर्षी प्रथमच अनधिकृतपणे होणारे पैसे वाटप रोखण्यासाठी कोस्टगार्ड, चार्टड फ्लाइट, रेल्वे, हेलिकॉप्टर, हवालामार्ग होणारे व्यवहार यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच १५ आयकर अधिकाऱ्याची फौज उमेदवारांच्या दैनंदिन सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवून असणार असल्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्त जे.एस. सहारिया यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेमुळे यावेळी पैसे वाटप होणार नाही असे म्हणणे चुकीचे असले तरी यावर काही प्रमाणात याला आळा बसेल यात शंका नाही.
मुंबई आर्थिक राजधानी असलेले शहर असले तरी या आर्थिक राजधानीमध्ये मतदानाबाबत उदासीनता आहे. मतदानाच्या दिवशी मतदार पिकनिक मुडमध्ये असल्याने गेल्या ४ - ५ निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ४२ ते ४९ टक्के अशी राहीली आहे. निवडणूक आयोग आणि मुंबई महापालिका जाहिराती द्वारे करोडो रुपये खर्च करत असली तरी मतदानाचा टक्का मात्र वाढलेला नाही. निवडणूक आयोग महापालिका मतदानाचा टक्का वाढवण्यात अपयशी ठरला आहे तसेच निवडणुकीला उभे असलेले उमेदवारही मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यास कमी पडले आहेत.
मुंबई महापालिकेच्या सन २०१२ च्या निवडणुकीत केवळ ४२ टक्के मतदान झाले होते ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असून भारतातील सर्वात मोठया महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ती शोभादायक नसल्याचे सांगत सहारिया यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार असल्याचे संगितले. यासाठी खाजगी सोसायटया, वृत्तपत्रे , सोशल मिडिया, शाळा कॉलेजांच्या माध्यमातून प्रचार केला जाणार असल्याचे सांगितले आहे. मतदार मुंबईबाहेर जात असल्याने सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी हा आठवड्यामधील मधला दिवस निवडला आहे. यावर्षी तरी मतदानाची टक्केवारी वाढावी अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
निवडणुकामध्ये पैसा, भांडी, कपडे मोठ्या प्रमाणात वाटले जातात, त्याचप्रमाणे या निवडणुकांदरम्यान दारूचा महापूर आलेला असतो. यावर्षी मुंबईत निवडणूक २१ फेब्रुवारीला असल्याने २० व २१ फेब्रुवारीला मुंबईत दारूबंदी करण्यात आली आहे. याच प्रमाणे २३ फेब्रुवारीला मतमोजणी असल्याने याही दिवशी दारूबंदी करण्यात आली आहे. आतापर्यंत दारूबंदी केल्यावर ज्या दिवशी दारूबंदी केली त्याच्या शेवटच्या दिवशी दारूधंदे, बार उघडले जातात. यावर्षी २१ फेब्रुवारीला सायंकाळी मतदान संपल्या संपल्या दारूचे धंदे, बार उघडले जातील आणि यामधून दारूचा महापूर वाहू लागेल. सकाळी मतदान केल्यावर सायंकाळी दारू पार्टीत असतील.
निवडणुकीच्या काळातच दारूबंदी करून काहीही फायदा नाही. उमेदवारांचा प्रचार करताना सायंकाळीही दारूची, जेवणाची सोय मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रचाराच्या दिवसातही रात्रीच्यावेळेस दारूचा पुरेपूर वापर केला जातो. प्रचारात उतरलेले अनेक कार्यकर्ते यासाठीच प्रचार करत असतात. दारूबंदी असताना त्या काळापुरता आधीच दारूची सोया करून ठेवली जाते. यामुळे २० व २१ फेब्रुवारी या दोन दिवसात दारूबंदी असताना आधीच दारूचा साठा करणार नाहीत याकडेही निवडणूक आयोग, उत्पादन शुल्क विभाग, निवडणूक अधिकारी यांनी लक्ष ठेवायला हवे. अन्यथा दारूबंदीचा खरंच फायदा होणार आहे का याचा निवडणूक आयोगाने विचार करायला हवा.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१६३
No comments:
Post a Comment