मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पालिकेवर भगवा फडकवण्याची उध्दव यांची घोषणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2017

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पालिकेवर भगवा फडकवण्याची उध्दव यांची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी)- देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेच्या कारभारावर भाजपाकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. मात्र भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पालिकेवर भगवा फडकवण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. 


पालिकेचे काम पारदर्शक आहे. भाजपच्या सोबतीशिवाय मुंबईत एकही काम झालेले नाही, असे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबई पालिकेवर भ्रष्टाराचे आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना फटकारले. यावेळी मुंबईत काव काव करणारे खुप कावळे आहेत. मात्र, पालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकवणार असून शिवसेनेचा महापौर बसल्यावर मार्चमध्ये पुन्हा पालिकेत येईन असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. थोर समाज सुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या तैलचित्राचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई पालिकेत अनावरण झाले यावेळी ते बोलत होते. 

उध्दव ठाकरे यांनी पालिका आणि ठाकरे कुटुंबीयांचे जवळचे संबंध आहेत. पालिकेचा इतिहास फार मोठा आहे. प्रबोधनकारांनी मुंबई पालिकेचा पाया रचला. तर बाळासाहेबांनी मुंबई राखून ठेवण्याचे काम केले. त्यांचाच वारसा ठाकरे कुटुंबीय चालवत आहेत. “आम्ही मुंबईत अनेक विकासकामे केली. त्या कामाच्या उद्घाटनासाठी स्वत: मुख्यमंत्री उपस्थित होते. भाजपशिवाय मुंबई महापालिकेत कोणतीही विकासकामे झाली नाहीत. मुंबईच्या विकासकामात भाजपाचा सिंहाचा वाटा आहे. शिवसेनेच्या प्रत्येक कामात भाजपने मोलाची साथ दिल्याचे सांगत पालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना विरोधकांसह ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाना साधला. गेल्या काही दिवसांपासून भाजपने शिवसेनेवर मुंबईच्या विकासकामावरुन हल्लाबोल केला होता. तसेच मुंबई पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्याचा खरपूस समाचार उध्दव ठाकरे यांनी घेतला.

मुंबई पालिकेत प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र लागल्याने आता थेट महापौरांच्या कारभारावरच त्यांचे लक्ष राहणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले. आचारसंहिता लागण्यापूर्वी पालिकेत आलोय. आता शिवसेनाचा महापौर विराजमान झाल्यावर परत येऊ, असे सांगत पालिका निवडणुकीत शिवसेनेचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवले आहे. अनेक चालीरिती त्यांनी मोडून काढल्या आहेत, अशा महापुरुषाचे तैलचित्र पालिका सभागृहात लागल्यामुळे उध्दव ठाकरे यांनी मनसेचे चेतन कदम, शिवसेनेचे राजू पेडणेकर आणि रमाकांत रहाटे या तीन प्रमुख नगरसेवकांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे आभार मानले. अग्निशमन दलाचा इतिहास संग्रहीत करण्यासाठी संग्रहालय, अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यु झाल्यानंतर त्याच्या एका नातेवाईकाला नोकरीचे वचन पाळण्याच्या सुचना उद्धव यांनी प्रशासनाला केल्या.

सामाजिक विषमतेला संपविण्यासाठी प्रबोधनकारांनी लढा दिला. समाज सुधारण्यांसाठी त्यांचे विचार प्ररणादायी आहेत. ते आपण आत्मसात करून नव्या वर्षाचा संकल्प करूया, असा मोलाचा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यावेळी पुण्यातील सनातनी प्रवृत्ती विरोधात प्रबोधनकारांनी पुकारलेल्या बंडाचे उदाहरण दिले. जातीयता आणि चुकीच्या प्रथा पंरपरा, हुंडा बंदीबाबत त्यांनी प्रवाहाच्या विरोधात जावून काम केले. प्रबोधनकारांच्या कर्तव्याप्रमाणे त्यांचे तैलचित्र लावायला आम्हाला उशीर झाला. त्यांच्या विचारांना आणि संघर्षाला आम्ही न्याय देवू शकलो नाही, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. तसेच अग्निशमन दलातील कार्यप्रणालीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, एरव्ही मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोणतीही राजकीय टीका टिप्पणी न केल्याने मुख्यमंत्री सोयीचे राजकारण करत असल्याची चर्चा मुंबई महापालिकेत रंगली होती 

दरम्यान, तैलचित्राबरोबरच सॅनेटरी नॅपकिंन वेडींग मशिन, दुकाने व आस्थापना नोंदणी ऑनलाईन पोर्टल, खासगी शाळांना मान्यताप्राप्त ऑनलाईन परवानगीचे लोकापर्ण आणि मुंबई अग्निशमन दलाच्या कॉफी टेबल बूक या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी, महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, खासदार अरविंद सावंत, रामदास भाई कदम, राहूल शेवाळे, अनिल देसाई, शिवसेना नेते लिलाधर डाके, रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Bottom Ad