...तर मुंबईतील मुस्लीम वॉर्डात 7770 कोटी खर्च करेन : ओवेसी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2017

...तर मुंबईतील मुस्लीम वॉर्डात 7770 कोटी खर्च करेन : ओवेसी

ओवेसी यांची चौकशी करावी भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार -मुंबई - मुंबईत 21 टक्के मुस्लिम आहेत आणि मुंबई महापालिकेचं बजेट हे 37 हजार कोटी रुपये इतकं आहे. त्यामुळे जर एमआयएमला मतं दिली, तर मुस्लिम वार्डात 7 हजार 770 कोटी रुपये खर्च करेन, असं दावा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
मुंबईतील नागपाडामध्ये काल एमआयएमच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी असदुद्दीन ओवेसी बोलत होते. मुंबईतील मुस्लीम समाजाला त्यांच्या लोकसंख्येएवढाच निधी देण्याचं आश्वासन ओवेसी यांनी यावेळी दिलं.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “मुंबई महापालिकेचं बजेट 37 हजार कोटी रुपये आहे आणि 21 टक्के मुसलमान आहेत. जर आपण महापालिकेला पैसा देत आहोत तर महापालिकेचीही जबाबदारी आहे की मुस्लीम परिसरातही त्या पैशांचा वापर करायला हवा. हा आपला घटनात्मक अधिकार आहे. बीएमसीमध्ये एमआयएमचे 20 ते 25 नगरसेवक निवडून द्या. शिक्षण, रुग्णालय, पाणी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी 7770 कोटी रुपये मुंबई महापालिकेच्या मुस्लीम वॉर्डमध्ये खर्च केले जातील, असं वचन एमआयएम तुम्हाला वचन देत आहे.”

मुंबई भाजपाची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारलोकसंख्येच्या आधारावर महापालिकेचे बजेट मुस्लिम धर्मियांना मिळावे असे भडकावू आणि बेकायदेशीर वक्तव्य करणाऱ्या खासदार आसुद्दीन ओवेसी यांची चौकशी करावी अशी तक्रार मुंबई भाजपा ने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे,

मुंबई येथील नागपाडा येथे ओवेसी यांनी घेतलेल्या सभेत लोकसंख्येच्या आधारावर मुस्लीम धर्मियांना महापालिकेच्या बजेटची टक्केवारी मिळावी अशी मागणी केली होती. त्याला मुंबई भाजपाने जोरदार विरोध केला आहे. त्याचा निषेध ही केला आहे आणि याबाबत मुंबई भाजपाचे महामंत्री सुमंत घैसास यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून या प्रकरणी त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांचे वक्तव्य समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे, जातीय सलोखा बिघडवणारे आहे. त्यासोबतच जाती धर्म आणि भाषेच्या नावावर मते मागता येणार नाहीत या सर्वोच्च न्यायालयाने आजच दिलेल्या आदेशाच्या विरूद्ध असून. असे वक्तव्य हे मुस्लीम समाजाचे सुध्दा नुकसान करणारे आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी मागणी मुंबई भाजपा महामंत्री सुमंत घैसास यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात केली आहे.

दरम्यान याबाबत इलेक्टॉनिक माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, आम्हाला कुठलीच टक्केवारी मान्य नाही. जाती - धर्मा मध्ये तेढ निर्माण करणारी टक्केवारी मागणाऱ्या ओवेसी यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सबका साथ सबका विकास हाच नारा भाजपा चा असून सर्व जाती धर्माच्या समाज घटकांना समान न्याय देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशी डोकी भडकवणाऱ्या वक्तव्याची चौकशी होऊन त्यावर कारवाई करावी अशी भाजपाची भूमिका आहे. असे ही आमदार अॅड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad