बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर या १० महानगरपालिकांसह २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मार्च महिन्यात दहावी व बारावीच्या परिक्षा असल्याने व महापालिका बरखास्त होण्यापूर्वी निवडणूका घेणे बंधनकारक. महापालिकांचा कार्यकाळ मार्च ते एप्रिल मध्ये तर पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांचा कार्यकाळ एप्रिल पर्यंत संपत असल्याने फेब्रुवारीच्या १६ व २१ या तारखेला एकाच वेळी निवडणूका घेतल्या जाणार आहेत.
१० महापालिकेच्या 1,268 जागांसाठी निवडणूक होत असून यात महिलांसाठी 636 अनुसूचित जातीसाठी 171, अनुसूचित जमातीसाठी 38, नागरिकांचा मागसप्रवर्ग (ओबीसी) साठी 343 जागा राखीव आहेत. २५ जिल्हा परिषदेच्या एकूण 1,510 जागांसाठी मतदान होणार असून यात महिलांसाठी 761, अनुसूचित जातीसाठी 189, अनुसूचित जमातीसाठी 156, नागरिकांचा मागसप्रवर्ग (ओबीसी) साठी 408 जागा राखीव आहेत. २८३ पंचायत समितींच्या एकूण 3,000 जागांसाठी निवडणूक होत असून यात महिलांसाठी 1,500, अनुसूचित जातीसाठी 386, अनुसूचित जमातीसाठी 293, नागरिकांचा मागसप्रवर्ग (ओबीसी) साठी 797 जागा राखीव आहेत.
१० महापालिका, २५ जिल्हा परिषद, व २८३ पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ७४६ आंबेडकरी व बहुजन समाजाला आपले स्वतःचे हक्काचे लोकप्रतिनिधी निवडून द्यायची संधी आली आहे. आता पर्यंत आंबेडकरी जनतेने आणि बहुजन समाजाने विविध राजकीय पक्षात असलेल्या लोकप्रतिनिधींना आरक्षित प्रभागामधून निवडून दिले आहे. हे लोकप्रतिनिधी कोणत्या तरी पक्षाशी संबंधित असल्याने त्या राजकीय पक्षाच्या विचारधारेला सोडून आपल्या समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यास किंवा आपल्या लोकांना सोयी सुविधा मिळवून देण्यास कुठे तरी कमी पडत आहेत.
यामुळे आंबेडकरी विचारधारेला मानणाऱ्या समाजाचा विकास करायचा असल्यास आपले हक्काचे लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. आपले हक्काचे लोकप्रतिनिधी असल्यास शासनाच्या सोयी, सुविधा, उपक्रम, योजना, आंबेडकरी जनतेपर्यंत आपला समाज म्हणून पोहोचवण्यास बांधील असतील. अनेक राजकीय पक्षांनी आता पर्यंत आंबेडकरी समाजात फूट पाडून आंबेडकरी जनतेच्या मतांच्या आधारावर राजकारण करून आपली सत्तेची पोळी भाजून घेतली आहे. लोकप्रतिनिधी आणि नेते आपला विकास करत असताना आंबेडकरी जनता आणि बहुजन समाजाचा विकास मात्र त्या प्रमाणात होताना दिसत नाही.
बहुजन आणि आंबेडकरी समाजात नोकऱ्या, शिक्षण, सामाजिक सुरक्षा, वस्ती पातळीवर सोयी सुविधा आजही पोहचलेल्या नाहीत. असे असताना निवडणूका तोंडावर आल्यावर मात्र आश्वासनाचे गाजर दाखवून, निवडणुकीच्या आधी पैसे, कपडे, भांडी देऊन मत मिळवली जात आहेत. नुकत्याच झालेल्या नगर पालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी, बहुजन समाजातील लोकप्रतिनिधी निवडणूक आले. मात्र यामध्ये हि लोकप्रतिनिधी प्रस्तापित राजकीय पक्षाच्या "ए", "बी" फॉर्म वर निवडून आल्याने आता या लोकप्रतिनिधींना त्या पक्षाच्या व्हीपप्रमाणे भूमिका घ्यावी लागणार आहे. हि परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे.
आंबेडकरी व बहुजन समाजाच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने असलेला एट्रोसिटी कायदा रद्द करता येत नाही हे माहीत असतानाही हा कायदा रद्द करण्याच्या, बदल करण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाला प्रेरित करण्यात आले. मराठा व आंबेडकरी समाजाला आपसात लढवण्याचे षडयंत्र रचण्यात आले. हे षडयंत्र फसले असले तरी यामधून आंबेडकरी समाज मात्र एकत्र झाला आहे. एकत्र झालेल्या आंबेडकरी, बहुजन, मुस्लिम समाजाने महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यातून लाखोंचे मोर्चे काढले आहेत. लाखोंच्या मोर्चे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मनात असलेली खदखद, संताप बाहेर काढण्यासाठी हाच समाज नगर पालिका व नगर परिषदांच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्यास उताराला आहे.
आंबेडकरी,बहुजन, मुस्लिम समाज एकत्र आल्यावर काय होते हे औरंगाबादमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिले होते. त्याची पुनरावृत्ती नगरपालिका व नगर परिषद निवडणुकांमध्ये झाली आहे. आंबेडकरी व बहुजन समाजाने भारिप बहुजन महासंघाचे ३ नगराध्यक्ष, तर कारंजा ( वाशिम ) - 18, बुलढाणा - 2, खामगाव - 1, जळगाव जामोद - 1, शेगाव - 1, तेल्हारा - 1, मुर्तिजापुर - 4, अकोट - 3 असे नगरसेवकही निवडून आले आहेत. सुरेश माने यांच्या बहुजन सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टीचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत. कांशीराम व मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचेही ३ नगरसेवक निवडून आणले आहेत.
आंबेडकरी पक्षातील गटातटाच्या राजकारणाला लोक कंटाळली आहेत. राजकारण्यानी यापासून आज पर्यंत धडा घेतला नसल्याने आंबेडकरी, बहुजन समाजातील नवीन पिढी एकत्र आली आहे. राजकीय नेतृत्व एकत्र येत असल्याने आंबेडकरी, बहुजन जनतेला एकत्र आणले जात आहे. आपल्या समाजातील मते विभागली जात आहेत हे नेत्यांना काळात नसल्याने आता हि मते एकत्र एकाच ठिकाणी कशी पडतील यासाठी काम सुरु आहे. अनेक ठिकाणी यावर विचार मंथन सुरु आहे. नगर पालिका आणि नगर परिषदे प्रमाणे पुन्हा आपले लोकप्रतिनिधी निवडून आणायची संधी महापालिका, पंचायत समित्या व जिल्हा परिषदा मधील मतदारांना चालून आली आहे.
कामाला लागा आपसातील हेवे दावे बाजूला ठेवा, खांद्याला खांदा लावून आपला हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून आणा. विभागात एकत्र बसून एकच उमेदवार द्या त्याच उमेदवाराला आपली सर्व मते कशी मिळतील यासाठी काम करा, मत विभागणी होणार नाही याची काळजी घ्या, आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायती पासून, स्थानिक स्वराज्य संस्था. विधानसभा, संसदेत भांडणार असल्याने अश्याच लोकप्रतिनिधीना निवडून द्या. बाबासाहेब आंबेडकर यांनी बघितलेले शासनकर्ती जमात बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी कामाला लागा. अभि नाही तो कभी नाही अशी वेळ आलेली आहे. आता चुकलात तर पुढील अनेक पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत याची जाणीव ठेवा.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment