मालमत्ता करमाफीचे आश्वासन म्हणजे निर्णयापुर्वीच श्रेय लाटण्याचा प्रकार - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

22 January 2017

demo-image

मालमत्ता करमाफीचे आश्वासन म्हणजे निर्णयापुर्वीच श्रेय लाटण्याचा प्रकार

.com/blogger_img_proxy/
मुंबई 21 Jan 2017 -
पुन्हा सत्तेत आल्यास मुंबईतील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांवर मालमत्ता कर आकारला जाणार नाही, हे शिवसेनेने दिलेले आश्वासन आणि हा मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव आपणच सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांना दिला होता, हा भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा दावा म्हणजे निर्णयापुर्वीच श्रेयासाठीची लढाई असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. अशाच पद्धतीने गेल्या निवडणुकीत महालक्ष्मी रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्याचे शिवसेनेने दिलेले आश्वासन हवेत विरून गेले होते, त्यामुळे आता मालमत्ता करमाफीच्या आश्वासनावर मुंबईकरांनी कितपत विश्वास ठेवावा, असा सवालही त्यांनी केला.
नरिमन पॉईंट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महापालिका उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यावेळी बोलताना मा. अहिर यांनी शिवसेना आणि भाजप या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सध्या दोन्ही पक्ष पाचशे चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या सदनिकांच्या मालमत्ता कर माफीच्या श्रेयासाठी झगडत आहेत. पण अजून कशाचाच कशाला पत्ता नसताना निर्णयापुर्वीच श्रेयलाटण्याचा हा प्रकार मुंबईकर पहिल्यांदाच पाहात अाहेत, अशा खोचक शब्दांत अहिर यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणतात, आमदार म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव दिला होता. त्यावर आमचा सवाल आहे की, जर खरोखरच असा प्रस्ताव दिला होता तर निर्णय घेण्यास तुम्हाला कुणी अडवले होते. एरव्ही आंतरराष्ट्रीय बाजारात जरी तेलाचे भाव खाली अाले, तरीही मुंबईत मोठमोठे कटआऊट्स लावून त्याचे श्रेय मिळवणारे शेलार या प्रस्तावाचे श्रेय घेण्यात कमी कसे पडले, याचे आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचा खरमरीत टोला अहिर यांनी लगावला. तर शिवसेना म्हणते सत्तेत आल्यावर आम्ही मालमत्ता कर माफ करणार, पण सरकारमध्ये तुमच्या शब्दाला कवडीचीही किंमत नसताना तुम्ही हा प्रस्ताव कसा मंजुर करणार असेही अहिर यांनी शिवसेनेला सुनावले.

मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक आरोग्य कवच योजना जाहीर करणार असे आश्वासनही शिवसेनेने दिले आहे. मात्र आरोग्य सेवेचे आश्वासन त्यांनी गेल्या महापालिकेच्या जाहीरनाम्यातही दिले होते, याची आठवण करून देत मा. अहिर म्हणाले की, जनतेला चांगली आरोग्य सेवा देणे, हे महापालिकेचे मुलभूत कर्तव्यच आहे. ते नीट पार न पाडता निवडणुकीच्या तोंडावर आरोग्य सेवेची घोषणा केली जात असेल, तर गेल्या पंचवीस वर्षांत मुंबईकरांना चांगली आरोग्य सेवा पुरवण्यात हे सत्ताधारी अपयशी ठरल्याचीच ही अप्रत्यक्ष कबुली असल्याचेही ते म्हणाले.

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात शिवसेनेला अपेक्षित असलेल्या मुद्द्यांचा समावेश करावा, यासाठी शिवसेना खासदारांनी नुकतीच केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले. याबाबत विचारले असता मा. अहिर म्हणाले की, अगोदर १ फेब्रुवारीला हा अर्थसंकल्प सादर करू नये, यासाठी शिवसेना आग्रही होती, आता मात्र केंद्र सरकार आपल्या मताला भीक घालत नाही, हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेला सुचलेले हे उशिराचे शहाणपण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तसेच सध्या सुरू असलेल्या युतीच्या चर्चेवरही मा. अहिर यांनी जोरदार टीका केली.एकिकडे महापालिकेत "कॉन्ट्रॅक्ट माफियाराज'सुरू आहे. आणि या माफियांचे सरदार वांद्रे पुर्व येथील "कलानगर'ला बसलेत,असे भाजपचे नेते म्हणतात. तर दुसरीकडे शिवसेनावाले म्हणतात की, हे सरकार म्हणजे निजामाच्या बापाचे सरकार आहे. असे असतानाही "कॉन्ट्रॅक्ट माफिया' आणि "निजामाच्या बापा'दरम्यान सध्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. ही जागावाटपाची चर्चा नाही तर पुढील पाच वर्षात कुणी किती खायचे या वाटमारीसाठीची चर्चा सुरू असल्याचा टोलाही अहिर यांनी यावेळी लगावला.

Post Bottom Ad

Pages