मुंबई : भाजपाने युतीच्या चर्चेच्या तिसर्या फेरीत घाटकोपर, दादर, बोरिवली, वर्सोवा आणि विलेपार्ले येथे मुंबई पालिका निवडणुकीत जागा सोडण्याची मागणी भाजपाने केली आहे. मात्र, या जागा सोडण्यास शिवसेनेची तयार नसून त्यापेक्षा युती न झालेली बरी अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीतल्या मताधिक्यावर जागांचा निकष ठरवावा, अशी आग्रही भूमिका भाजपाने घेतली आहे. मात्र, शिवसेनेची ६0 जागा देण्यास तयारी आहे. भाजपाला मात्र ताकद वाढली असतानाही एवढय़ा कमी जागा घेऊन युती करणो मान्य नाही. शिवाय विधानसभा निवडणुकीत जिथे जास्त मताधिक्य भाजपाला आहे, त्या जागा मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह धरला आहे.
घाटकोपर विधानसभा मतदारसंघात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि आमदार राम कदम यांनी घवघवीत यश मिळवलेल्या घाटकोपरमध्ये चक्क आठ जागा सोडण्याची मागणी भाजपानं केली आहे. घाटकोपरमध्ये सेनेनं केवळ चार जागांवर लढावं, असा भाजपाचा प्रस्ताव आहे. तर पार्ले आणि बोरिवली येथे गुजराती आणि ब्राह्मण मतदार मोठय़ा प्रमाणावर असून ही भाजपाची व्होट बँक असल्याचं सांगून भाजपानं पार्ल्यातही काही जागांवर दावा केला आहे. त्याशिवाय दादरमध्येही ब्राह्मण व्होट बँक असल्यानं दादरच्या जागेचीही भाजपानं मागणी केली आहे. वर्सोवा येथील जागाही भाजपाला मिळावी, असा आग्रह भाजपाचा आहे. दादरमध्ये शिवसेना-मनसे आमने सामने असताना येथेही भाजपानंही तगडा उमेदवार उभा करण्याची जोरदार तयारी केली आहे. एकीकडे ११४ जागा तसेच विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतधिक्याच्या निकषावर जागा मिळाव्यात, असा आग्रह ठेऊन भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. भाजपाने मागितलेल्या जागा शिवेसना मान्य करणार नाही. त्यापेक्षा युती नसलेली बरी, अशाच प्रतिक्रया शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहेत.