मुंबई : नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघ, आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना व डावे यांनी आघाडी केली आहे. विशेष म्हणजे काँंग्रेसमधील नाराज १६ कार्यकर्ते भारिपमधून निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत माहिती आहे. येत्या २६ जानेवारीनंतर सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
निवडणुकीत आतापर्यंत बौद्ध, मागासवर्गीय नेत्यांनी महायुती किंवा आघाडीसोबत राहून निवडणूक लढवली. याचा मोठा फायदा युती-आघाडीलाच झाला आहे. २0१२च्या पालिका निवडणुकीत आठवले गटाचा एक, प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाचा एक व युथ रिपब्लिकन एक असे तीन नगरसेवक निवडून आले. नेत्यानी गटातटातल्या राजकारणासाठी युती-आघाडीसोबत फरफटतच राहण्याची परंपरा कायम ठेवली असताना प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाने समविचारी पक्षांना सोबत घेऊन जायचा निर्णय घेतला आहे. आनंदराज व प्रकाश आंबेडकर तसेच डावे एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याने बौद्ध मागासवर्गीयांची मते या आघाडीकडे वळून नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या १६ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार नाही, हे नक्की झाल्यावर भारिपमधून निवडणूक रिंगणात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये मुलाखती दिल्यानंतर तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने शिवाय काँंग्रेसमधील गटातटातल्या राजकारणात तिकिटाची प्रतीक्षा करत राहण्यापेक्षा भारिपमधून उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय शिवसेनेमधील २, भाजपामधील १ आणि काँग्रेसमधील १६ कार्यकर्ते अशा १९ जणांचा समावेश असून त्यांना भारिप-बहुजन महासंघातर्फे उमेदवारी दिली जाणार आहे. हे सर्व भांडुप, विक्रोळी, कांदिवली या विभागातील कार्यकर्ते आहेत.