सांताक्रुझमधील रोटरी क्लब उद्यानात सुरु होणार मिनी ट्रेन
मुंबई : मुंबईतील अनेक बकाल उद्यानांचे तसेच मैदानांचे सुशोभिकरण करुन नवसंजीवनी देण्याचे काम सुरु असतानाच आता बच्चे मंडळींसाठी मिनी ट्रेन उद्यानांमधून सुरु करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. सांताक्रुझ (पश्चिम) येथील रोटरी क्लब उद्यानामध्ये ही टॉय ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष, यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली आहे. ही मुंबईतील उद्यानामधील पहिली टॉय ट्रेन ठरेल.
मुंबईतील अनेक मैदानांत लहान मुले तसेच तरुणांना खो-खो, कबड्डी, हॉलीवॉल, लंगडी आदी मैदानी खेळ खेळता यावेत या दृष्टीकोनातून विकास करण्यात येत आहे. मनोरंजन मैदाने लहान मुलांसाठी विकसित करताना त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे खेळाच्या साहित्याचा आनंद लुटता यावा, अशाप्रकारे खेळणी बसविण्यात येत आहेत. अशाप्रकारे सांताक्रुझ (पश्चिम) १६ वा रस्ता येथील रोटरी क्लब उद्यानामध्ये टॉय ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उद्यानात लहान मुलांसाठी मिनी ट्रेन अस्तित्वात होती. परंतु, मागील अनेक वर्षांपासून ती नादुरुस्त स्थितीत होती. या उद्यानात येणाऱया मुलांसाठी मिनी ट्रेन ही मुख्य आकर्षण होते. त्यामुळे उद्यानात येणाऱया मुलांचा हिरमोड व्हायचा. येथील ट्रेनची सुविधा पुन्हा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी वीजेवर चालणारी ही मिनी ट्रेन खरेदी करण्यात येणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष, यशोधर (शैलेश) फणसे यांनी सांगितले. अशाप्रकारे उद्यानांमध्ये मिनी ट्रेनची सुविधा नवी मुंबई, बदलापूर येथे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सांताक्रुझ येथील उद्यानात ही मिनी ट्रेन उपलब्ध करुन देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी केली असून त्यानंतर, विभागातील उद्यानांमध्येही अशाप्रकारे मिनी ट्रेन बसवल्या जातील, असे फणसे यांनी सांगितले.