मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावर केली जाणारी विविध कामे निर्धारित पद्धतीने व सुयोग्यप्रकारे व्हावीत, यासाठी त्यावर देखरेख ठेवण्याचे काम पालिकेच्या 'दक्षता' खात्याचे असते. हे काम अधिक गुणवत्तापूर्ण पद्धतीने व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व्हावे, तसेच निविदा प्रक्रियेमधील स्पर्धात्मकता वाढावी, यासाठी पालिकेच्या दक्षता खात्याद्वारे केंद्र सरकारच्या दक्षता विभागाच्या धर्तीवर नवीन सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत निविदा प्रक्रियेत सहभागी होणा-या कंत्राटदारांनी एकावेळेस किती रकमेची कामे हाती घ्यावी, यावर देखील नव्या कार्यपद्धती अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेच्या दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता मनोहर पवार यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मध्यवर्ती निविदा प्रक्रियांबाबत सुधारित कार्यपद्धती सप्टेंबर – २०१६ मध्येच लागू करण्यात आली आहे.
३ लाखांपर्यंत अंदाजित खर्च असणारी अभियांत्रिकी स्वरुपाची कामे ही कोटेशन आधारित पद्धतीने केली जातात. त्यावरील २५ लाखांपर्यंतची कामे ही निविदा पद्धतीने केली जातात. यानुसार करण्यात येणा-या २५ लाखांपर्यंतच्या कामांना 'कोटेशन' अथवा 'अतारांकित निविदा' आधारित कामे असे म्हटले जाते. याप्रकारची कामे ही प्रामुख्याने पालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत (वॉर्ड ऑफीस) प्रस्तावित केली जातात. कंत्राटदारांनी या प्रकारची किती कामे एकावेळी हातात घ्यावी, यावर यापूर्वी मर्यादा नव्हती. मात्र आता सुधारित कार्यपद्धतीनुसार एका कंत्राटदाराला जास्तीतजास्त ५ कोटीपर्यंतचीच कामे एकावेळेस हाती घेता येणार आहेत. यामुळे कामाची गुणवत्ता वाढण्यासोबतच नवीन कंत्राटदारांची संख्या वाढून निविदा प्रक्रियेतील स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होणार आहे. याविषयीच्या सुधारित मार्गदर्शक धोरणानुसार संबंधित खात्यातील अधिका-यांनी अभियांत्रिकी कामाच्या प्रत्येक टप्प्यावर कामाच्या अटी व शर्तींवर आधारित परिपूर्ण बाबींचा अनुवृत्ती अहवाल निर्धारित करण्यात आलेल्या तक्त्यांमध्ये संबंधित खातेप्रमुखांकडे सादर करणे आवश्यक असणार आहे. तसेच या कामात कुचराई करणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्याची तरतूद देखील या नवीन कार्यपद्धती अंतर्गत करण्यात आली आहे विभाग पातळीवर किंवा खाते स्तरावर करण्यात येणारी छोट्या स्वरुपाची अभियांत्रिकी कामे प्रत्यक्ष स्वरुपात करत असताना त्यात आवश्यकतेनुसार काही बदल होण्याची शक्यता असते. नवीन कार्यपद्धतीमध्ये अशा बाबींची दखल घेण्यात आली असून ज्यामुळे परिस्थितीनुरुप उद्भवलेल्या बदलांची नोंद घेणे शक्य होणार आहे. तसेच अभियांत्रिकी कामांबाबत दक्षता विषयक कार्यवाही करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्राधान्याने अवलंब करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. या सारख्या अनेक बाबीं अंतर्भूत असलेल्या सुधारित कार्यपद्धतीमुळे कामानुसार आवश्यक बाबींची प्रतिपूर्ती सुयोग्यप्रकारे होऊन कामांचा गुणात्मक दर्जा जपणे शक्य होणार आहे.