पहिल्या टप्प्यात ५० सार्वजनिक शौचालयांमध्ये बसविणार 'रेटींग मशीन'
मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिका क्षेत्रातील पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचा दर्जा कसा आहे? या प्रश्नाचे उत्तर ठरविण्याचे अधिकार आता नागरिकांच्याही हाती देण्यात येत आहेत. या अंतर्गत पालिकेच्या अखत्यारितील सार्वजनिक शौचालयांमध्ये 'रेटींग मशीन' बसविण्यात येत आहेत. या मशीनवर सदर शौचालय 'स्वच्छ आहे', 'ठीक आहे' वा 'अस्वच्छ आहे', असे ३ पर्याय असणार आहेत. शौचालयाचा वापर करणा-याला शौचालयाबद्दलचे त्याचे मत या ३ पर्यायांपुढील एक बटन दाबून नोंदविता येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार देशातील हा या प्रकारचा पहिलाच प्रयोग असून यातील पहिले मशीन हे छत्रपति शिवाजी टर्मिनस जवळील भाटिया बागेच्या समोर असणा-या शौचालयात काही दिवसांपूर्वी बसविण्यात आले आहे, अशी माहिती 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.
पालिका क्षेत्रातील पालिकेच्या अखत्यारितील सार्वजनिक शौचालये ही अनेक ठिकाणी स्वयंसेवी संस्थांना देखभालीसाठी देण्यात आली आहेत. या संस्थांद्वारे या शौचालयांची देखभाल व निगा योग्यप्रकारे होत आहे अथवा नाही? हे बघण्यासाठी पालिकेची स्वतःची यंत्रणा आहे. मात्र या यंत्रणेत शौचालयांचा वापर करणा-या नागरिकांना त्यांचे मत थेटपणे नोंदविण्याची सुविधा नव्हती. ही बाब लक्षात घेऊन स्वच्छ अभियानांतर्गत पालिका शौचालयांमध्ये आता रेटींग मशीन्स बसविण्यात येत आहेत, असेही दिघावकर यांनी सांगितले आहे.पहिल्या टप्प्यामध्ये पालिकेच्या ५० सार्वजनिक शौचालयांमध्ये हे रेटींग मशीन्स बसविण्याचे प्रस्तावित आहे. या प्रत्येक मशीनवर हिरव्या, पिवळ्या व लाल रंगाचे बटन आहे. 'हिरवे बटन' हे शौचालय 'स्वच्छ' असल्याचे निदर्शक असणार असून, 'पिवळे बटन' हे शौचालय 'ठीक' असल्याचे निदर्शक असणार आहेत. तर शौचालय 'अस्वच्छ' असल्यास 'लाल बटन' दाबणे अपेक्षित असणार आहे. शौचालयाचा वापर करणारे नागरिक शौचालयाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी यापैकी एक बटन दाबू शकतील. पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांबाबत नागरिकांनी नोंदविलेली मते वेळ व दिनांकाच्या तपशीलासहित संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत. यामुळे पालिकेला सार्वजनिक शौचालयांच्या दर्जाबाबत नागरिकांची मते लक्षात घेऊन त्यानुसार संनियंत्रण करणे दैनंदिन स्वरुपात शक्य होणार आहे. तसेच एखाद्या सार्वजनिक शौचालयाबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नकारात्मक मते नोंदविल्यास सदर शौचालयाशी संबंधित स्वयंसेवी संस्थेवर पालिकेद्वारे कारवाई देखील करण्यात येणार आहे, अशीही माहिती दिघावकर यांनी दिली आहे.