सोलापूरात बहुजन क्रांतीचा मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2016

सोलापूरात बहुजन क्रांतीचा मोर्चा

सोलापूर / 27 Dec 2016 -
अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, बहुजन समाजातील नेत्यांवरील आकसातून होणारी कारवाई थांबवा, मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्या, ख्रिश्चन समाज आणि चर्चवरील हल्लेखोरांवर कडक कारवाई करा, यांसह इतर मागण्यांसाठी सोलापूर शहरात बहुजन क्रांतीचा अतिविशाल मोर्चा काढण्यात आला. शिस्तबद्ध, काटेकोरपणे मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, हा मोर्चा शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला.

त्यानंतर मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, पार्क चौकातील राजमाता अहिल्याबाई होळकर, चार हुतात्मांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर पार्क चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पार्क स्टेडिअमवर मोर्चा आला. यानंतर पार्क स्टेडियमवर विविध मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी भाजप सरकारवर विविध मान्यवरांनी जोरदार टीका केली. या मोर्चात विविध प्रकारच्या घोषणाबाजी, फलक दाखवण्यात आले. मोर्चात विविध संस्था, संघटनांनी पाणी, फळे वाटप केले. धनगर समाजाच्या प्रमुखांनी, भटक्या-विमुक्तांच्या सर्व प्रमुखांनी तसेच माजी आमदार लक्ष्मण माने यांनी सक्रिय पाठिंबा जाहीर केला.

याशिवाय मोची समाज, मातंग समाज, मुस्लीम समाज, ख्रिश्चन समाज, ओबीसी समाजबांधवांनी पाठिंबा दिलेला आहे. मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी 50 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. 10 हजार स्वयंसेवक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. बहुजन क्रांती मोर्चाच्या मागण्यांची राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी; अन्यथा दि. 21 जानेवारी 2017 रोजी 50 लाख लोकांच्या उपस्थितीत मुंबई येथे मोर्चा काढून राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला. दरम्यान, बहुजन क्रांती मोर्चाचे प्रातिनिधीक स्वरूपात पाच जणांनी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांना बहुजन क्रांती मोर्चातील विविध मागण्यांचे निवेदन दिले़ तब्बल चार ते साडेचार तास चाललेल्या या मोर्चाचे पहिले टोक सम्राट चौक, शिवाजी चौक तर शेवटचे टोक पार्क स्टेडियमवर होते़ मोर्चाला मोठया प्रमाणात गर्दी झाल्याने पार्क स्टेडिअमपासून फुटणारे चारही रस्ते मोर्चेक-यांनी ओसंडून गेले होते. या निवेदनावर डॉ. सायली शेंडगे, वल्लभी सोनवले, भारत परळकर, खलिक मन्सुर, विजय पोटफाडे, पप्पू गायकवाड, मधुकर आठवले, अ‍ॅड. राजन दीक्षित, भुजंग गायकवाड, दत्ता सिध्दगणेश आदींच्या स्वाक्षरी आहेत.

चोख पोलीस बंदोबस्त बहुजन क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलीस उपायुक्त, 6 सहायक पोलीस आयुक्त, 18 पोलीस निरीक्षक, 77 पोलीस उपनिरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक, 900 पोलीस कर्मचारी, 200 महिला पोलीस, राज्य राखीव दलाची एक तुकडी, 500 होमगार्ड, 10 वॉच टॉवर असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ शहरातील चारही बाजूने मोर्चामध्ये सहभागी होणाºया समूहांच्या गर्दीमुळे 100 फुटांच्या अंतरावर पोलीस तैनात करण्यात आले होते़ सकाळी सातपासून चोख बंदोबस्त तैनात केला असून, याशिवाय मोर्चाच्या मार्गावरील उंच इमारतींवर 10 वॉच टॉवरची विशेष सोय करण्यात आली आहे.

मोर्चातील प्रमुख मागण्या- अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. या कायद्याची अंमलबजावणी करण्यात कुचराई करणा-या पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच या कायद्याशी संबंधित शासनयंत्रणेला जबाबदार धरून त्यांच्या विरोधात कारवाई करावी. अ‍ॅट्रॉसिटीची प्रकरणे विशेष न्यायालयात चालवून सहा महिन्यांत निकाली काढावीत. अ‍ॅट्रॉसिटीबरोबरच राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
- दलित असो अथवा सवर्ण महिलांवरील बलात्कार प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. विशेष न्यायालयात अशी प्रकरणे चालवून सहा महिन्यांत निकाली काढावीत.
- ओबीसी कोट्यातून इतर कोणत्याही समाजाला आरक्षण न देता घटनेत विशेष तरतूद करून इतर समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावे.
- देशातील जमिनी, उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करून सर्वांना समान न्याय, समान संधी व समान संपत्ती देण्यात यावी.
- राज्यातील सर्व सहकारी साखर कारखाने राज्य शासनाने ताब्यात घेऊन ते चालवावेत. जे सहकारी साखर कारखाने बेकायदेशीरपणे अवसायनात काढून त्यांची चुकीच्या मागार्ने विक्री करून खासगी मालकांच्या हवाली करण्यात आले आहेत, ते शासनाने परत घेऊन या सर्व चुकीच्या विक्री प्रक्रियेची चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी.
- लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.
- भटक्या विमुक्तांसाठी रेणके आयोग त्वरित लागू करावा.
- मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सच्चर समितीच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी.

Post Bottom Ad