मुंबई : मुंबई मनपा, मुंबई शहर तालिम संघ आणि मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने २९ वी अखिल भारतीय मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ ते २७ डिसेंबरदरम्यान वडाळय़ाच्या भारतीय क्रीडा मंदिरात स्पर्धा भरेल. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद््घाटन होईल. स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्यास रोख आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येईल.
जागतिक, राष्ट्रकुल, आशियाई, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले मल्ल स्पर्धेत कौशल्य सादर करताना दिसतील. संदीप यादव, राहुल आवरे, उत्कर्ष काळे, विक्रम कुराडे, रेश्मा माने, रणजीत नलावडे, कौसल्या वाघ, स्वप्नाली आमरे, माधुरी मिसाळ, समाधान पाटील, शिवाजी पाटील, माऊली जमदाडे, कौस्तुभ डाफळे, विक्रम जाधव, आप्पा सरगार, राजेंद्र राजमाने अशी मुख्य मल्लांची नावे आहेत. मुंबई महापौर चषक गटात ७४ किलोपेक्षा अधिक, मुंबई महापौर कुमार चषक गट (५0 ते ६0 किलो वय १७ वर्षांच्या आत), मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कुस्तीगिरांसाठी र्मयादित (५७ ते ६२ किलो), (६२ ते ६८ किलो),(६८ ते ७४ किलो), महिला वजनी गट (५0 ते ६0) किलो या गटात स्पर्धा रंगतील. तसेच मुंबई महानगरपालिका शाळेतील मुले आणि मुलांसाठी३२ किलो, ३२ ते ३५ किलो, ३५ ते ४२ किलो, ४२ ते ५0 किलो, मुलींचा गट (४0 ते ४५ किलो), (४५ ते ५0 किलो) या गटात स्पर्धा रंगतील. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या नियमानूसार गादीवर स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर तालिक संघाचे कार्याध्यक्ष संजय शेटे यांनी दिली. सर्वोच्च २ लाखांपासून ५00 रुपयांपर्यंत विविध गटांतील विजेत्यांना गौरवण्यात येणार असल्याचे सरचिटणीस प्रकाश तानवडे यांनी सांगितले.