दमणगंगा, वैतरणा, गारगाई पिंजाळ राष्ट्रीय प्रकल्प व्हावेत यासाठी प्रयत्न करणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2016

दमणगंगा, वैतरणा, गारगाई पिंजाळ राष्ट्रीय प्रकल्प व्हावेत यासाठी प्रयत्न करणार - मुख्यमंत्री

मुंबई 1 Dec 2016 : मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दमणगंगा, वैतरणा, गारगाई पिंजाळ या प्रकल्पांचा राष्ट्रीय प्रकल्पामध्ये समावेश करण्यासाठी केंद्रीय जलसंपदा आणि नदी विकास मंत्री उभा भारती यांच्याशी चर्चा करुन केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

भांडूप येथील सुरक्षारक्षक कवायत मैदान येथे गुंदवली कापूरबावडी भांडूप संकुल भूमिगत जलबोगद्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. त्याप्रसंगी शिक्षणमंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री विनोद तावडे, सावर्जनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई महानगर पालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार सरदार तारासिंह, अशोक पाटील, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेचे केंद्र आणि राज्य शासनाकडे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासन यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, हा जलबोगदा भविष्याचा वेध घेऊन तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई शहराला पुढील 100 वर्ष सुरळीत पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

हा प्रकल्प गुंदवली ते कापूरबावडी आणि कापूरबावडी ते भांडूप संकुल अशा दोन टप्प्यांत एकत्रित बांधण्यात आला आहे. पहिला टप्पा 6.8 किलोमिटर लांबीचा असून दुसरा टप्पा 8.3 किलोमिटर लांबीचा आहे. बोगद्याची एकूण लांबी 15.1 किलोमिटर असून जमिनीखालून सुमारे 100 मिटर खोलीवर बांधण्यात आला आहे. इतिहासात नोंद होईल असा हा प्रकल्प असून त्याचे उद्घाटन करताना आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि त्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. मुंबई शहराला पायाभूत सोयी-सुविधा पुरवठा करताना पाणी पुरवठा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. मुंबई शहराचा विकास करताना रस्ते, टॉवर, हॉटेल यापेक्षा शुद्ध पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, जल शुद्धीकरण, सुरळीत वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न करून शाश्वत विकास करून मुंबई शहराचा आम्हाला असलेला अभिमान आम्ही कायम ठेवू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुबईतील एसआरए अंतर्गत जे प्रकल्प वेळेत पुर्ण होत नाहीत ते प्रकल्प राज्य शासन घेऊन टेंडर प्रकिया राबवून पारदर्शक पद्धतीने वेळेत पुर्ण करेल. कोस्टल रोड आणि रेल्वेच्या एमयूटीपी-३ ला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लोकलवरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प आता पुर्ण होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पामुळे अनेकांच्या घरात शुद्ध आणि सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प आनंद आणि समाधान देणारा आहे. गेली अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प पुर्ण झाला. या प्रकल्पाचे काम करतांना मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन अतिशय कठीण काम पुर्ण केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS