पाणी गळती, दूषितीकरण रोखण्यासाठी पालिका ३० कोटी खर्च करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2016

पाणी गळती, दूषितीकरण रोखण्यासाठी पालिका ३० कोटी खर्च करणार

मुंबई - मुंबई शहरातील विविध ठिकाणी असलेल्या जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती आणि दूषितीकरण रोखणे, पर्जन्य वाहिन्यांमधून जलवाहिन्यांचे स्थलांतरण, सेवा वाहिन्यांचे जाळे कमी करून गंजलेल्या आणि जुन्या जलवाहिन्या बदलणे आदी कामे मुंबई महापालिका हाती घेणार असून या कामांसाठी सुमारे ३0 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामांसाठी पूर्वी जानेवारी २0१५पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्रादारांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र सध्याच्या कंत्राटदाराची मुदत येत्या ३१ डिसेंबरपर्यंतच असल्याने नवीन कंत्राटदाराची नेमणूक तातडीने होणे गरजेचे असल्याने नव्या कंत्राटदाराला ठेका देण्यात येणार आहे.

ए, बी, सी, डी, ई आणि पी-उत्तर, आर-मध्य, आर- दक्षिण, एच-पूर्व या विभागांमध्ये ही कामे करण्यात येणार आहेत. यापैकी पी- उत्तर विभागातील ३२७ गळत्या जलवाहिन्यांमधून होणारी गळती रोखण्यात येणार असून आर-मध्यमधील २७७, आर- दक्षिणमध्ये २६३, एच-पूर्वमध्ये २४७ तर दक्षिण मुंबईतील ए, बी, सी, डी, ई या विभागांतील ११६ अशा एकूण एक हजार २३0 इतक्या जलवाहिन्यांमधून होणारी पाणीगळती रोखण्यात येणार आहे. या सर्व विभागांमध्ये एकूण ६३ पर्जन्य जल वाहिन्या असून, त्यांचेही स्थलांतर केले जाणार आहे.

मुंबईत ठिकठिकाणी ६१ जुन्या आणि गंजलेल्या जलवाहिन्या आहेत. त्यादेखील बदलण्याच्या कामांचाही प्रस्ताव आहे. पी-उत्तर विभागातील नऊ ठिकाणी सेवा वाहिन्यांचे जाळे कमी करताना अत्यावश्यक असलेल्या सध्याच्या जलवाहिन्यांवरील झडपांचे चेंबर्स बांधणे, अत्यावश्यक नळखांब बसविणे आणि नादुरुस्त नळखाबांची दुरुस्ती करणे, आदी कामेही करण्यात येणार आहेत. या सर्व कामांच्या सर्व ठिकाणी रस्त्यावरील चरींचे पुर्नपुष्टीकरण करणे कंत्राटदाराला बंधनकारक राहणार असेल, अशी तरतूद निविदेमध्ये के ली आहे. ही कामे झाल्यानंतर अशुद्ध पाण्याची आणि पाणी गळतीच्या समस्या कमी होतील असा प्रशासनाचा दावा आहे.

Post Bottom Ad