चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर - आंबेडकरांच्या स्मारकाचे काम लवकर पूर्ण करणे हीच आदरांजली - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 December 2016

चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर - आंबेडकरांच्या स्मारकाचे काम लवकर पूर्ण करणे हीच आदरांजली - मुख्यमंत्री

मुंबई - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, उपेक्षित जनतेचे कैवारी, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर उसळला होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महत्त्वपूर्ण, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या युगपुरुष डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करत बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी फडणवीस बोलत होते.  

फडणवीस म्हणाले, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आपल्या सर्वांना एक दिशा मिळाली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मार्गांचे पालन करून आपण पुढे जात आहोत. बाबासाहेबांनी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला. त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. बाबासाहेबांनी ‘प्रॉब्लेम आॅफ रुपी’ हा ग्रंथ १९२३ साली लिहिला असला तरी तो आजच्या काळातही उपयोगी पडणारा आणि सुसंगत आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, आ. भाई गिरकर यांच्यासह मान्यवरांनीही आदरांजली वाहिली. यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई पोलीस दलाद्वारे शासकीय सलामी देण्यात आली. 

राज्यघटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सोमवारी सायंकाळपासूनच अनुयायांची लांबच लांब रांग लागली होती. देशाच्या कानाकोपर्‍यातून कुटुंबासह अनुयायी शिवाजी पार्कमध्ये आले होते. दिवसभर दादर, चैत्यभूमी व शिवाजी पार्कचा परिसर अनुयायांनी फुलून गेला होता. विद्यार्थी व तरुणांनी बाबासाहेबांचे विचार व त्यांचा संदेश जलसे व पथनाट्यांच्या माध्यमातून सादर केले. नशाबंदी, शिक्षण, समानता आदींबाबत यावेळी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. नोटाबंदीमुळे बाबासाहेबांना अभिवादन करण्यास मुंबईला येण्यासाठी कोणताही त्रास झाला नसला तरी पुस्तके आणि इतर साहित्य घेताना मात्र अडचण होत असल्याचे मुंबई बाहेरून आलेल्या भीम अनुयायांनी सांगितले. नोटबंदीमुळे यावर्षी ५० ते ६० टक्के पुस्तके व साहित्य विकले गेले नसल्याची प्रतिक्रिया पुस्तक व साहित्य विक्रेत्यांनी दिली आहे. 

Post Bottom Ad