मुंबई, दि. 20 Dec 2016:
मिठी नदी परिसरातील अनधिकृत बांधकाम हटविणे तसेच अधिकृत बांधकामातील रहिवाश्यांचे स्थलांतर करण्यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, तसेच नदीत सोडल्या जाणा-या सांडपाण्यामुळे प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात व त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज दिले.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मिठी नदी व मुंबईतील इतर नद्यांच्या प्रदुषणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतिश गवई, महापालिका आयुक्त अजोय मेहता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन, अतिरिक्त उपजिल्हाधिकारी अंजली भोसले, प्रादेशिक अधिकारी एम. आर. लाड आदींसह अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री कदम यांनी यावेळी मिठी नदीबाबत झालेल्या कामांचा आढावा घेतला व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या. मिठी नदीच्या परिसरातील 6 किमी अंतरातील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचे काम हे ‘एमएमआरडीए’कडे तर 11 किमी अंतरातील काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते. मात्र,अपूर्णावस्थेत असलेले काम तातडीने पूर्ण करावे. नदीतील गाळ काढण्यासंदर्भातील कामाचा अहवाल सादर करावा. 67 छोट्या भागांतून प्रदूषित पाणी नदीत सोडले जाते, त्यावर उपाययोजना आखण्यासंदर्भातील अहवालही त्वरित सादर करावा, असे निर्देश कदम यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
मिठी नदी परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील व वसाहतीतील येणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात नियम आखण्यात येणार आहेत. या क्षेत्रात किती झाडे लावता येतील यासंदर्भातही सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना कदम यांनी संबंधितांना दिल्या आहेत. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यावेळी पूर्ण केलेल्या कामाची माहिती देऊन, उर्वरित अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासंदर्भातील योजना पुढील 15 दिवसांत सादर करून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.