मुंबई / प्रतिनिधी
मुंबई स्वच्छ राहण्यासाठी अक्षरश: पहाटे ४ पासून रस्ते सफाई करणारे महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार असोत किंवा महापालिकेच्या दवाखान्यांमधून वा रुग्णालयांमधून अविरत रुग्णसेवा करणारे कामगार असोत, या सर्वांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिका या सर्व कामगारांना साबण आणि टॉवेलचा पुरवठा करीत असते. यासाठी मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येऊन त्याच्या मार्फत 'कार्बेालिक साबण' व 'हनिकोंब टॉवेल' पुरवण्याची महापालिकेची आतापर्यंतची पद्धत होती. मात्र या पद्धती मधील प्रशासकीय व तांत्रिक अडचणींमुळे कामगारांना या वस्तूंचा पुरवठा कधी- कधी विलंबाने होत असे. ही बाब लक्षात घेऊन आता साबण व टॉवेल ची रक्कम थेटपणे कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या १ जानेवारी २०१७ पासून याविषयीची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
आतापर्यंत महापालिकेच्या कामगारांना दरमहिन्याला द्यावयाच्या साबण व टॉवेलची खरेदी मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत निविदा पद्धतीने केली जात असे. यामुळे अनेकदा कालापव्यय होत असे. तसेच खरेदी केलेले साबण विभाग कार्यालयातून कामगारांपर्यंत वितरण करण्यात देखील वेळ जात असे. या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिकेच्या प्रत्येक कामगाराला महिन्याला साधारणपणे ४ साबणाच्या वड्या लागतात व प्रत्येक साबणाची अंदाजित किंमत ही रुपये २०/- इतकी असते, हे गृहित धरुन वर्षाला ४८ साबणांसाठी रुपये ९६०/- एवढी रक्कम थेटपणे कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक सहामहिन्यात एका टॉवेल साठी रुपये ७०/- याप्रमाणे वर्षाला दोन टॉवेलसाठी रुपये १४०/- देखील कामगारांच्या बँक खात्यात थेटपणे जमा होणार आहे.
यानुसार 'कॅशलेस' पद्धतीने महापालिकेच्या प्रत्येक कामगाराच्या बँक खात्यात दर सहा महिन्याला रुपये ५५०/- याप्रमाणे वर्षाला अकराशे रुपये रुपये एवढी रक्कम थेटपणे जमा होणार आहे. महापालिकेमध्ये सध्या सुमारे ४२ हजारांपेक्षा अधिक कामगार आहेत. ही संख्या लक्षात घेतल्यास महापालिका कामगारांसाठीच्या साबण व टॉवेलवर दरवर्षी सुमारे ४ कोटी ६० लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च करणार आहे.