मुंबई दि.21 - ठाण्याच्या कळवा भागातील गरीबांच्या तीन हजार झोपडपट्या नियमबाह्य रित्या हटवण्याच्या कारवाईस मुख्यमंत्री आणि विधान परिषद सभापती यांनी स्थगिती दिली असतांनाही त्यांचे निर्देश डावलणार्या ठाणे महानगर पालिका आयुक्तां विरूध्द हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
ठाण्याच्या कळवा भागातील शासनाच्या जागेवरील तीन हजार झोपडपट्या काढण्याचे महापालिकेला अधिकार नसतांनाही ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी कारवाई सुरू केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या सुचनेवरून सदर कारवाई थांबविणे बाबत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवुन मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समक्ष आयुक्तांना या झोपडपट्या हटवण्याच्या कारवाईस स्थगितीचे आदेश दिले होते. त्यानंतर सभागृहातही धनंजय मुंडे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे हा विषय उपस्थित करून आयुक्तां मार्फत होणारी कारवाई थांबवण्याची मागणी केली असता त्याची दखल घेवुन याबाबत आपल्या दालनात बैठकीद्वारे निर्णय होत नाही तो पर्यंत झोपडपट्या हटवण्याची ही कारवाई स्थगित करण्याचे निर्देश त्यांनी विधान परिषदेत दिले होते. सदर बाब प्रशासकिय यंत्रणेद्वारे ठाणे महापालिकेला कळवल्या गेली असतांनाही आयुक्त संजय जैस्वाल यांनी काल ठाणे महापालिकेच्या महासभेत हा विषय चर्चेसाठी समोर आणला.
याबाबत धनंजय मुुंडे यांनी आज तातडीने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे आयुक्तांच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्री व सभापतींचे निर्देश डावलणार्या आयुक्तां विरूध्द हक्कभंग दाखल करणार असल्याचे सांगितले.
चार वर्षापुर्वी ठाण्यातील अनधिकृत इमारती पाडण्याचे असेच आदेश झाले असतांना सदर कारवाई करू नये यासाठी ठाण्यातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी खा. शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेवुन याप्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यावेळी पवार साहेबांनी ठाण्याचा दौरा करून पत्रकार परिषद घेवुन आघाडीचे सरकार असतांनाही या अनधिकृत इमारती पाडता येणार नाहीत हे अमानविय कृत्य असुन आधी पुनर्वसन करा आणि नंतरच अनधिकृत इमारती पाडा अशी भुमिका घेतल्याने तत्कालीन आघाडी सरकारने ती कारवाई थांबवली होती.
पवार साहेबांच्या विचारांचा वारसा आपण पुढे चालवत आहोत. केवळ सौंदर्याला डाग पडतो म्हणुन झोपडपट्टी पाडा ही आयुक्तांची भुमिका माणुसकीला ठेच पोहोचवणारी आहे. तुम्हाला जर गरिबांची घरे सौंदर्याला बाधक ठरत असतील तर गरिबांनी काय करायचे याचा निर्णय एकदा महासभेत घ्या असे सुनावतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने विरोधी पक्षनेते म्हणुन आपण शरदचंद्रजी पवार साहेब ज्याप्रमाणे गरिबांच्या मागे उभे राहिले त्याच प्रमाणे ठाण्यातीलच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातील गरिबांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मुंडे यांनी या पत्रकात म्हटले आहे. झोपडपट्टी पाडण्याची जे भाषा करीत आहेत ते उद्या अनधिकृत इमारती पाडण्याचीही कारवाई करतील तेव्हा काय करायचे असा सवाल उपस्थित करीत या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राजीनाम्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे आपण स्वागत करतो व अनधिकृत इमारती, झोपडपट्टीमध्ये राहणारे गरिब हे मजबुरीने राहतात लाचारीने नाही त्यांच्या बाजुने उभे राहणे हाच आपला धर्म असुन त्या धर्माचे पालन करणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.