माजी आमदार सुरेश गंभीर आणि बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांचा भाजपात प्रवेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 December 2016

माजी आमदार सुरेश गंभीर आणि बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांचा भाजपात प्रवेश

मुंबई दि. 2 Dec 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे समर्थन करत माहिम विधानसभा मतदार संघातून चार वेळा आमदार म्हणून निवड़ून आलेले सुरेश गंभीर आणि बेस्ट समितीवर सदस्य म्हणून कार्यरत असलेले कामगार नेते सुनिल गणाचार्य यांनी आज दादर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा मध्ये प्रवेश केला. काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आज औपचारिक प्रवेशाचा कार्यक्रम मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झाला.

माहिम परिसरातून १९७८ साली नगरसेवक आणि त्यानंतर माहिम विधानसभा मतदार संघातून चार वेळा आमदार म्हणून सुरेश गंभीर निवडून आले होते. तसेच त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. तळागाळातील कार्यकर्ते अशी त्यांची ओळख असून त्यांच्यासोबत आज त्यांची कन्या मिनल गंभीर- देसाई यांनीही भाजपात प्रवेश केला. मिनल या फिल्म क्षेत्रात काम करत असून सध्या झी मराठी वरील लोकप्रिय मालिकांच्या त्या प्रोड्यूसर म्हणून त्या काम पाहात आहेत.

सुनिल गणाचार्य हे बेस्ट समितीवर कार्यरत असून एक अभ्यासू सदस्य अशी त्यांची ओळख आहे. १९९७ ते २००२ या काळात ते कुर्ला येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर त्यानंतर २००४ पासून ते बेस्ट समितीवर सदस्य म्हणून आज तागायत कार्यरत आहेत. तर २००५ पासून बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणिस आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणिस म्हणून कार्यरत आहेत.

पक्ष प्रवेशानंतर बोलताना माजी आमदार सुरेश गंभीर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समाजातील तळागाळातील उपेक्षीत वर्गासाठी काम करत आहेत. त्यांनी नोबंदीचा निर्णय घेतल्यानंतर समाजाच्या सर्व घटकांतून पाठींबा मिळतो आहे. सामान्य व्यक्तिला त्यांनी केलेल्या कामामुळे ते आपलेसे वाटत आहेत. त्यातून सामान्य माणसाला चांगले दिवस येतील अशी नक्की आशा आहे. त्यामुळे मी त्यांच्या कार्यावर प्रभावीत होऊन भाजप मध्ये प्रवेश करत आहे. मी यापूर्वी ज्या पक्षात होतो तिथेही मला सन्मानाची वागणूक मिळाली माझा कोणताही रोष त्या पक्षावर नाही. त्या पक्षाचे नेतेही चांगले काम करत आहेत मला पंतप्रधान करत असलेल्या सामान्य माणसासाठीच्या कामात सहभागी होता यावे म्हणून मी भाजप प्रवेश करत असून मी कोणत्याही पदासाठी आणि उमेदवारीसाठी पक्षात आलेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तर सुनिल गणाचार्य म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात विकासाचे मुद्दे घेऊन काम करत आहेत. पंतप्रधानांनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा सर्वसामान्यांच्या हिताचा आहे तसेच केंद्र सरकार मुंबईसाठी अनेक योजना राबवत असून दोन्ही सरकार मिळून मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरू होत आहेत. मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी काम करणाऱ्या भाजपा मध्ये मी आज प्रवेश करत आहे. मला या विकासकामांत आणि जनतेच्या सेवेत काम करता यावे म्हणून भाजपा मध्ये येत असल्याचे सांगत आपला पूर्वीच्या पक्षावर कोणताही रोष नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad

JPN NEWS