कृषि सेवा केंद्रांना मार्च 2017 अखेर 10 हजार पीओएस मशीन
नागपूर, दि.16 : देशातील काळा पैसा बाहेर काढून अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी केंद्र शासनाने 500 व 1000रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा पुढचा टप्पा हा देशातील जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करणे असा आहे. त्याची सुरूवात देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांपासून सुरू झाली पाहिजे. कृषी निविष्ठा खरेदी करताना कॅशलेस पद्धत वापरल्यास शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक निश्चितच थांबणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
शेतकऱ्यांनी रोखरहित व्यवहार करण्यासाठी कृषि निविष्ठा विक्री केंद्रांना पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन पुरविण्यात येणार आहेत. कृषि विभाग व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने'रामगिरी' येथे कृषि केंद्र चालकांना पीओएस मशीनच्या वाटपाचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, कृषि आयुक्त विकास देशमुख, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक दिपांकर बोस, कृषि विभागाचे अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, कृषी सेवा केंद्र चालक आदी यावेळी उपस्थित होते.
'कॅशलेस' व्यवहार करण्यासाठी कृषि विभागाने घेतलेल्या पुढाकाराचे अभिनंदन करित मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारच्या कॅशलेस व्यवहाराच्या निर्णयाला सर्व विभागांनी आधार द्यावा. त्याची सुरूवात कृषी विभागाने केली आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषि क्षेत्रावर म्हणजेच शेतकऱ्यांवर अवलंबून आहे आणि या कॅशलेस व्यवहारांची सुरूवात शेतकऱ्यांपासून होत आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पारदर्शक व मजबूत होईल. कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कृषि निविष्ठा खरेदी करतात. ही सर्व खरेदी पीओएस मशीनच्या माध्यमातून 'कॅशलेस' पद्धतीने झाल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाचे चुकारेही भविष्यात कॅशलेस पद्धतीने देण्याबाबत कार्यवाही पूर्ण करावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कृषिमंत्री फुंडकर म्हणाले की, कॅशलेस व्यवहारांना शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यापासून शेतकरी दूर राहू नये. यासाठी कृषि केंद्रांकडेच पीओएस मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मार्च 2017 पर्यंत राज्यात 10 हजार कृषि केंद्र धारकांना पीओएस मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कॅशलेस व्यवहार पद्धत भविष्यात वाढतच जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी पीओएस मशीनचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री यांच्या हस्ते पीओएस मशीनद्वारे खरेदी करतानाचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांना पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले. यामध्ये वर्धा येथील श्रीनिवास चांडक, मोबीन शेख,उमेश मुंदडा, ब्रिजकिशोर सारडा, जगदीश चांडक, नागपूर येथील श्यामसुंदर राठी, अजय नेने, महेंद्र गुप्ता, खंडाळे कृषी सेवा केंद्र,बुलडाणा येथील विशाल कृषी केंद्र, वैष्णवी ॲग्रो सेंटर, नितीन ॲग्रो सेंटर, अकोला येथील मोहन सोनावणे, अमरावती येथील सुनील मुंदडा,यवतमाळचे प्रदीप बनगीरवार यांचा समावेश आहे.