असले महामोर्चे नकोच ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2016

असले महामोर्चे नकोच !

मराठा समाजाने महामोर्चे काढल्यानंतर या महामोर्चामधून अट्रॉसिटी रद्द करण्याची व अट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली. वास्तविक पाहता देशात अनुसूचित जाती जमातीवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असतात. या अन्याय अत्याचाराला आळा घालता यावा म्हणून अट्रॉसिटी कायदा करण्यात आला. हा कायदा केंद्र सरकारने बनवला असल्याने यामध्ये बदल करावयाचा झाल्यास संसदेमध्ये बहुमताने करावी लागेल. अट्रॉसिटी कायदा रद्द केल्यास किंवा त्यात बदल केल्यास संपूर्ण भारतात आगडोंब पसरू शकतो. याची माहिती सरकारला असल्याने सरकार हा कायदा रद्द करण्यास पाऊल टाकणार नाही. केंद्र सरकारच्याच राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी भारतातील अट्रॉसिटीची काय परिस्थिती आहे याची प्रचिती देते. भारतातील आकडेवारी पाहिल्यास कोणतेही सरकार हा कायदा अधिक कडक करण्याची भूमिकाच घेऊ शकते.
असे असताना हे जे गुन्हे दाखल होत आहेत ते फक्त मराठा समाजा विरुद्धच दाखल होत आहेत असे वाटत असल्याने मराठा समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. जर एखाद्याने कायदा हातात घेऊन अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार झाल्यास गुन्हा दाखल होणे स्वाभाविकच आहे. जर कोणी कायदा हातातच घेतला नाही तर असे गुन्हे दाखलच होणार नाहीत हे समजून घेण्याची गरज आहे. राजकीय काटे काढण्यासाठी किंवा इतर चुकीच्या पद्धतीने जर कोणावर गुन्हे दाखल झाले तर असे खोटे गुंन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. परंतू त्यासाठी कायदा रद्द करणे किंवा त्यात बदल करणे हा मार्ग नक्कीच नाही. मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. त्यासाठी त्यांनी काय नियोजन केले आणि त्याच्या बातम्या कश्या प्रसिद्ध करवून आणल्या हे लोकांना चांगले माहीत आहे.

मराठा समाजाने मोर्चे काढले म्हणून बौद्ध, बहुजन, मुस्लिम समाजाने महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मोर्चे काढले. या मोर्चाला उस्फुर्त अशी लोकांची गर्दी होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महामोर्चे निघतात मग मुंबई सारख्या महानगरामध्ये मोर्चा का निघू शकत नाही आपण तो काढू असा विचार करत अनेक मंडळी कमला लागली. मिटिंगीवर मीटिंगी झाल्या. लोकांमध्ये मतभेद निर्माण झाले. कोणाला मूक मोर्चा हवा होता, कोणाला बोलका मोर्चा हवा होता, कोणाला पक्षात काम करणारे राजकीय लोक नको होते, अश्या अनेक मुद्द्यांवरून फाटाफूट निर्माण झाली. आणि मुंबईमध्ये २४ डिसेंबरला दोन, २१ जानेवारीला एक, व जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात एक असे एकूण चार मोर्चे निघणार हे निश्चित झाले. कोणी कोणाच्या ऐकण्या पलीकडे गेला होता. प्रत्येकाला दुसऱ्याने आपल्या मोर्चात सहभागी व्हावे असे वाटत होते.

२४ डिसेंबरला युवकांकडून निघणाऱ्या मोर्चामधील युवकांनी सारासार विचार करत वेगवेगळे मोर्चे निघाल्यास आपल्याच समाजाची बदनामी होईल म्हणून आणि समाजातील फूट इतर लोकांना दिसू नये म्हणून आपला महामोर्चा रद्द केला. परंतू त्याच दिवशी आणखी एक निघणारा संविधान सन्मान महामोर्चा मुंबईच्या आझाद मैदानात संपन्न झाला. ठाण्यात काढलेल्या मोर्चाच्या अनुषंगाने मुंबईतील मोर्चाला दोन लाख तरी लोक येतील अशी आयोजकांना अपेक्षा होती. मात्र हजार बाराशे लोकही महामोर्चात सहभागी झालेली नव्हती. याला युवकांनी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून महामोर्चा रद्द झाल्याची बातमी पसरवल्याचे कारण देण्यात आले. इतकेच नव्हे तर फ्यासिस्ट शक्तीबरोबर असलेल्या राजकीय नेत्यांनी अफवा पसरवल्याने लोकांची उपस्थिती कमी होती असे सांगण्यात येत होते.

जर असे असेल तर फ्यासिस्ट शक्तीच्या विरोधात रोहित वेमुल्ला प्रकरणी, आंबेडकर भवन प्रकरणी सरकार विरोधात प्रचंड मोर्चे निघाले नसते याचा विचार करण्याची गरज आहे. मुंबईमध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हे मोर्चे काढले आहेत याची नोंद सर्वानीच घेतली आहे. मग महामोर्चाला कोणी सांगितले म्हणून लोक उपस्थित राहिली नाहीत हे कारण चुकीचे वाटते. गेल्या कित्तेक वर्षात आंबेडकरी समाजातील नेत्यांचे दुसऱ्या पक्षाच्या जिवावर चाललेल्या दळभद्री राजकारणामुळे जनता कंटाळली आहे. समाजातील अनेक समस्या असताना या समस्या सोडवणारा आणि लोकांना चांगले जीवन राहणीमान निर्माण करून देणारा कोणताही नेता नसल्याने समाजाने नेत्यांना आपल्यापासून दूर केले आहे.

एखादा नेता कार्यक्रमासाठी आला तर त्याच्या कार्यक्रमाला जेवढी लोक जमली असतात तेवढी मते निवडणुकीमध्ये त्या विभागामधून मिळत नाही अशी परिस्थिती आहे. यावरून आता नेत्यांना आपली पातळी काय आहे हे ओळखायची गरज आहे. लोक नेत्यांच्या राजकारणाला कंटाळले असल्याने लोक आपले काम भले आणि आपले घर भले असा विचार करत आहेत. अश्या परिस्थिती मुंबईमध्ये लोक मोर्चाला जमतील अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. असाच प्रकार २४ डिसेंबरच्या महामोर्चा वेळी झाला. लोक काही जमली नाहीत. असेच जर झाले तर आणि पुढेही असे होणार असले तर महामोर्चे न काढलेले बरे असे वाटू लागले आहे. समाजाला पुढे नेण्यासाठी वेळेनुसार काही पाऊले पुढे मागे करणारे नेते समाजाला हवे आहेत याची नोंद घ्यायला हवी.

कोणत्याही मोर्चमध्ये नेत्यांची आयोजकांची आवश्यकता असते तसेच गर्दीसाठी लोकांचीही आवश्यकता असते. त्यासाठी लोकांना हे लोक आपले आहेत हे जो पर्यंत पटत नाही तो पर्यंत लोक त्यांच्या मागे जात नाहीत. महामोर्चा निघण्या अगोदरच आम्हाला फलाना फलाना विचार धारेचे, पक्षाबरोबरचे लोक चालत नाहीत असा प्रचार करण्यात आला. प्रत्येक निवडणुकीमध्ये मत देताना व्यवहार करून मते दिली जातात. पैसे. कपडे, भांडी वाटप होते आणि मग त्या पक्षाला मते दिली जातात. हे कुठल्या विचारसरणीचे पक्ष आहेत याचे लोकांना काहीही देणे घेणे नसते. यामुळे ज्याचे घेतले त्यांच्या खाल्या मिठाला जागण्यासाठी बहुतेक लोक मोर्चाला उतरली नसावीत. अन्यथा जितके मोर्चे निघाले त्या सर्वांमध्ये लोक सहभागी झाले असते.

याच २४ डिसेंबरच्या महामोर्चामध्ये चांगला अनुभव आला. पत्रकार म्हणून बातमी कव्हर करण्यासाठी गेल्यावर मोर्चाच्या स्टेजवर बामणी मिडियाला आणि चॅनेलला बाईट देण्याचे काम सुरु होते. मोर्चाचे आयोजक मीडियाशी काय बोलत आहे याची नोंद घेण्यासाठी आणि मोर्चाला उपस्थित असलेल्या लोकांचा फोटो घेण्यासाठी स्टेजवर जाताना अडवण्यात आले. बामणी मिडिया चालणाऱ्यानी बहुजन मिडीयाला रोखले म्हणायला हरकत नाही. प्रकार मिलिंद भवार, शेखर चन्ने, मुख्य आयोजक श्यामदादा गायकवाड यांच्या कानावर घातल्यावर स्टेजवरून फोटो काढायला मिळाले. एका पत्रकाराबरोबर असे प्रकार होत असतील सामान्य लोकांबरोबरही असेच काही प्रकार होत असतील ज्यामुळे लोक आयोजकांपासून लांब राहत असतील का याचाही विचार करण्याची गरज आहे.

मुंबईमध्ये अनुसूचित जातीचे ८ लाख लोक आहेत. ओबीसी मुस्लिम व इतर समाजाचा आकडा पाहिला तर प्रत्येक महामोर्चाला कमीतकमी १० ते १५ लाख लोकांची उपस्थिती अपेक्षित होती. असे झाले नसल्याने या पुढे मुंबईमध्ये आणखी दोन महामोर्चे निघत आहेत. २१ जानेवारीला वामन मेश्राम यांचा तर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित केलेला महामोर्चा होत आहे. वेळ अजून गेलेली नाही. सर्वानी एकत्र बसून निर्णय घेण्याची गरज आहे. एकच मोर्चा काढला तर त्याचा फायदा आहे. अन्यथा आपले हसे करून घेण्यासाठी मोर्चे काढले असे बोलायची वेळ यायला देऊ नका. समाजाची सोबत हवी असल्यास आधी सर्वाना एकत्र यावे लागेल. एकत्र न येणारे नेते समाजाला नको आहेत. याची नोंद घेण्याची गरज आहे.

अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad