शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते होणार अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भुमिपुजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2016

शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते होणार अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भुमिपुजन

मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकारचे भुमीपुजन येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या भुमीपुजनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशभरातल्या १९ ठिकाणांवरील माती आणि विविध नद्यांचे पाणी आणले जाणार आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असलेले हे देखणे स्मारक साकारण्यासाठी तब्बल ३६०० कोटी खर्च केले जाणार आहेत.


आंतराष्ट्रीय दर्जाचे हे स्मारक गिरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटरवर समुद्रात असलेल्या एका पाण्याखालच्या दगडावरील १५.८६ हेक्टरवर उभारले जाणार आहे. जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या हातून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा साकारला जाणार आहे. या चौथऱ्या सहीत या स्मारकाची उंची २१० मीटर उंच असून पुतळा १२६ मीटर, तर फक्त चौथऱ्याची ८४ मीटरचा असणार आहे. एकूण ३६०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प साकारला जाणार असून यापैकी पहिल्या टप्प्यात २५०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम १९ फेब्रुवारी २०१९ ला पूर्ण करण्याचा अभियंत्याचा प्रयत्न असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ११०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. समुद्रातील या स्मारकासाठी तांत्रीक समितीचीही स्थापना करण्यात आली असून ईजीआयएस या फ्रान्सच्या कंपनीद्वारे स्मारकाचा आराखडा तयार केला जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत कामाला सुरूवात होईल.

शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचा भुमिपुजन सोहळा पार पडत असून त्यासाठी महाराजांचे वास्तव्य असलेल्या शिवनेरी, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, राजगड, प्रतापगड या गडकिल्ल्यांसह शिखर शिंगणापूर, तुळजापूर, सिंदखेड राजा, कराड, जेजुरी, देहू आळंदी, रामटेक, वेरूळ, नाशिक, आग्रा, तंजावर आणि श्री शैलम या ठिकाणांवरून माती आणली जाणार आहे. यासह राज्यातील विविध नद्यांचे पाणी भुमीपूजनासाठी वापरले जाणार अाहे. 

गुरूवारी (२२ डिसेंबर) पर्यंत या साऱ्या वस्तूंच्या कलशांचे मुंबईत आगमन होणार असून त्या कलशांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच २३ डिसेंबराला हे सर्व कलश गेट आॅफ इंडीया येथे आणण्यात येतील. भुमिपुजनाच्या दिवशी मुख्यमंत्री हे कलश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती सुपूर्द करणार असून त्यांच्या हस्ते या कलशातील माती, दगड आणि पाण्याने भुमीपूजन सोहळा पार पडेल. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट असेल स्मारकाचे आकर्षण छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा अर्ध्या तासाचा लघुपट हे या स्मारकाचे आकर्षण असणार आहे. थ्री डी आणि फोर डीच्या सहाय्याने शिवकालीन वातावरणाची निर्मिती करणारा एक लाईट व साऊंड शोही या ठिकाणी सादर केला जाणार आहे. याशिवाय दररोज दोनशे कलाकाराच्या माध्यमातून राज्यभिषेकाचा प्रसंगही सादर केला जाणार असून स्मारकाच्या ठिकाणी दोन जेटींसह हेलीपॅडही उभारले जाणार आहे. या शिवाय येणाऱ्या पर्यटकांसाठी उपहारगृह तसेच वैद्यकीय सेवेची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

स्मारकाची वैशिष्ट्ये
☄ जलदुर्गाशी साध्यर्म असणारी दगडातील समुद्र तटबंदी
☄ आई तुळजाभवानी मंदीर
☄ कला संग्रहालय
☄ ग्रंथ संग्रहालय
☄ मत्स्यालय
☄ अॅम्पिथिएटर व हेलीपॅड
☄ आॅडीटोरीअम
☄ लाईट व साऊंड शो
☄ विस्तीर्ण बाग बगीचे
☄ रुग्णालय
☄ सुरक्षा रक्षक निवासस्थाने
☄ आयमॅक्स सिनेमागृह.
☄ प्रकल्प स्थळ ठिकाणी २ जेट्टी.
☄ चौथऱ्यामध्ये वेगवेगळ्या मजल्या वरून दृश्यावलोकनासाठी सोय.
☄ पर्यटकांना प्रकल्प स्थळाकडे जाण्यासाठी गेट वे आॅफ इंडीया, नवी मुंबई व इतर ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था
☄ स्मारक ठिकाणी शिवकालिन वातावरण निर्मिती

Post Bottom Ad