सार्वजनिक शौचालयांमध्ये महापालिकेद्वारे वीज व पाणी सुविधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2016

सार्वजनिक शौचालयांमध्ये महापालिकेद्वारे वीज व पाणी सुविधा

महापालिका क्षेत्रात सुमारे १७ हजार सार्वजनिक शौचालये
मुंबई /प्रतिनिधी
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अनेक सार्वजनिक शौचालयांमध्ये असणारा अंधार किंवा पाणीपुरवठा नसणे यासारख्या कारणांमुळे अनेक शौचालयांचा योग्य वापर होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक शौचालयांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वीज व पाणी सुविधा देण्याबाबत प्राथमिक कार्यवाही करण्यासाठी भांडवली खर्च करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यापूर्वीच दिले होते. याबाबतची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहे. महापालिका क्षेत्रात सुमारे १७ हजार सार्वजनिक शौचालये असून यामध्ये महापालिका, म्हाडा, इतर सरकारी यंत्रणा, खाजगी सार्वजनिक शौचालये व अन्य प्रकारच्या सार्वजनिक शौचालयांचा समावेश आहे.


नागरिकांची सुविधा व आवश्यकता लक्षात घेऊन महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांव्यतिरिक्त इतर संस्थांद्वारे बांधण्यात आलेल्या शौचालयांमध्ये देखील वीज व पाणीपुरवठा देण्याबाबत भांडवली खर्च करण्याची जबाबदारी महापालिकेने सुरुवातीच्या कालावधीकरिता घेतली आहे. यानुसार आवश्यक ती कार्यवाही मार्च २०१७ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या शौचालयांची व्यवस्था योग्यप्रकारे लागल्या नंतर ही शौचालये दैनंदिन परिरक्षणाकरिता वस्तीपातळीवरील संस्थांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता सिराज अन्सारी यांनी दिली आहे.
महापालिका क्षेत्रात महापालिकेसह म्हाडा, राज्य सरकार, केंद्र सरकार यासारख्या विविध संस्थांची १६ हजार ९९९ सार्वजनिक शौचालये आहेत. या सर्व शौचालयांमध्ये एकूण १ लाख १६ हजार ४४६ इतके शौचकूप आहेत. यापैकी काही शौचालयांमध्ये वीज अथवा पाणी पुरवठा सुविधा नसल्याने त्यांचा वापर होण्यास अडचणी येत होत्या. त्याचबरोबर विद्युत पुरवठा नसणा-या सार्वजनिक शौचालयांमध्ये अंधार झाल्यावर साहजिकच तिथे जाण्यास महिलांना, लहान मुलांना अडचण वाटू शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात असणा-या सर्व सार्वजनिक शौचालयांमध्ये वीज व पाणीपुरवठा देण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. तसेच या शौचालयांचे परिरक्षण (Maintenance), साफसफाई, नळ जोडणी व विद्युत व्यवस्था आदी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने यथोचित कार्यवाही करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. महापालिकेद्वारे सुविधा पुरविण्याची कार्यवाही काही कालावधीकरिता करण्यात येणार आहे. या शौचालयांच्या दैनंदिन परिरक्षणाबाबत व्यवस्था निश्चिती झाल्यानंतर सदर शौचालये वस्तीआधारित संस्थांकडे (Community Based Organizations) परिरक्षणासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

यानुसार महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात परिमंडळीय स्तरावरील उपायुक्तांची एक विशेष बैठक आज महापालिका मुख्यालयात संपन्न झाली. या बैठकी दरम्यान महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांमध्ये महापालिकेद्वारे देण्यात येणा-या सोयी सुविधांचा व विशेष करुन वीज व पाणी विषयक सुविधांचा विशेष आढावा घेण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व परिमंडळीय उपायुक्त व आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त आदी मान्यवर उपस्थित होते.

Post Bottom Ad