गुणवत्तापूर्ण शिक्षणसंधींसाठी गोंडवाना विद्यापीठाचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत - राज्यपाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2016

गुणवत्तापूर्ण शिक्षणसंधींसाठी गोंडवाना विद्यापीठाचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत - राज्यपाल

मुंबई, दि.२१ : आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणसंधींसाठी गोंडवाना विद्यापीठाचे विविध प्रश्न शासनाने तत्काळ मार्गी लावावेत अशा सूचना आज राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी दिल्या.


राजभवनात यासंबंधी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे सचिव आणि विद्यापीठाचे कुलगुरु उपस्थित होते.

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आणि विद्यापीठाचे कुलगुरु यांनी विद्यापीठासाठी आवश्यक असणाऱ्या २०० एकर जागेचा शोध घेऊन तीन महिन्यात जमीन संपादनाची कार्यवाही पूर्ण करावी असे आदेश देऊन राज्यपाल म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी गोडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठाच्या विभाजनानंतर गोंडवाना विद्यापीठात गणित, इंग्रजी, वाणिज्य, इतिहास आणि समाजशास्त्र या पाच पदव्यूत्तर वर्गाना मान्यता देण्यात आली. परंतू या विद्यापीठांतर्गत एकाही अनुदानित महाविद्यालयात पदव्यूत्तर अभ्यासक्रम उपलब्ध नाही.  विद्यापीठाचे विभाजन झाल्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचे सर्व पदवीधर विद्यार्थी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये प्रवेशाच्या नियमात २ टक्के कोट्यात येतात. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कुठल्याच पदव्युत्तर वर्गात प्रवेश मिळत नाही, हे  विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणापासून वंचित राहतात. हा त्यांच्यावर अन्याय असून तो दूर करावयाचा असेल तर यातून तत्काळ मार्ग काढणे गरजेचे असल्याचे सांगतांना राज्यपाल म्हणाले की यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंनी एकत्र बसून नागपूर विद्यापीठात गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा वाढविण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा व तो उच्च व तंत्र शिक्षण विभागास पाठवून एक महिन्याच्या आत त्यास मान्यता घ्यावी.

विद्यापीठाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विद्यापीठाने नागपूर येथे एक राष्ट्रीयस्तरावरील कार्यशाळेचे आयोजन केले आहे. हे विद्यापीठ शिक्षण क्षेत्रातील नामवंत विद्यापीठ होण्यासाठी अभ्यासपूर्ण रितीने या विद्यापीठाचा एकात्मिक विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार संस्थेचीही याकामासाठी नियुक्ती  करून तीन महिन्यात व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे,  असे राज्यपाल राव यांनी सांगितले.

Post Bottom Ad