संगणकीकृत चाचणी पथ प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करा - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2016

संगणकीकृत चाचणी पथ प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करा - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २७:   राज्यात सर्व जिल्ह्यात वाहनांसाठी संगणकीकृत चाचणी पथ उभारण्यात यावेत, तसा प्रस्ताव तयार करून परिवहन विभागाने तो  केंद्र शासनाकडे पाठवावा,  असे आदेश आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

आज परिवहन मंत्र्यांच्या दालनात परिवहन विभागासमोरील विविध आव्हानांचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.बैठकीस परिवहन मंत्री दिवाकर रावते, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम, एस.टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती वगळता अन्य कार्यालयात मानवीय पद्धतीने वाहन चालक चाचणी होते. सीआयआरटी, पुणे येथे कृत्रिम चाचणी पथावर कॅमेराचा वापर करून चाचणी होते. ही चार ठिकाणं सोडली तर इतर सर्वत्र होणारे वाहन चालक चाचणीचे काम मानवीय पद्धतीने होते. यामध्ये पारदर्शकता, वस्तुनिष्ठता आणण्यासाठी संगणकीकृत वाहन चाचणी पथांचे बांधकाम होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन प्रस्ताव तयार करावा, तो केंद्र शासनाकडे पाठवल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दि. ४ जानेवारी २०१७ रोजी भेट घेऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांना करण्यात येईल असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की,  याप्रमाणेच संगणकीय वाहन  योग्यता तपासणीचा प्रस्ताव तयार करून तो ही केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा, त्यासाठी देखील केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यात येईल.

परिवहन विभागाकडे विविध प्रकारचा ४ कोटी कागदी दस्तऐवज आहे, त्याचे डिजिटायझेशनचे काम  त्वरित हाती घेतले जावे असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की,  विभागांतर्गत इमारत उपलब्ध नसलेली कार्यालयाची संख्या २४ आहे.  ही कार्यालये किती वर्षांपासून भाडेतत्त्वावर आहेत, यासाठी आतापर्यंत किती रक्कम भाड्यापोटी प्रदान केली,  परिवहन विभागाकडे सध्या स्वत:च्या किती जागा उपलब्ध आहे, जागा उपलब्ध असल्यास कार्यालयांच्या बांधकामासाठी किती खर्च येईल याची माहिती विभागाने उपलब्ध करून द्यावी.  तसेच १० इमारतींच्या नुतनीकरणाचे काम लगेच हाती घेण्यात यावे. यासाठी चांगल्या सल्लागार संस्थेची नियुक्ती करून नवीन इमारती अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज करताना  पुढील दहा वर्षांची विभागाची गरज लक्षात घेऊन त्यांची रचना करण्यात यावी.

राज्यातील काही एस.टी महामंडळाच्या बस स्थानकांच्या नवीन बांधकामासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल असे वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad