मुंबई दि. 19 डिसेंबर 2016 -
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात काँग्रेस पक्षाचे आठ नगराध्यक्ष, 126 नगरसेवक आणि दोन नगरपंचायतीत बहुमत मिळाल्याने काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष समोर आला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी हा विजय काँग्रेस कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगून त्यांचे अभिनंदन केले. राज्यातील सत्ताधारी भाजपाने मोठ्या प्रमाणात सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर केला. या संपूर्ण निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी पाच सभा घेतल्या तरी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनतीने यश मिळवले असे चव्हाण म्हणाले. भाजपच्या यशात पैसा आणि सत्तेच्या गैरवापराचा मोठा वाटा आहे हे रावसाहेब दानवे यांच्या पैठण येथील सभेतल्या वक्तव्यावरून तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांवर दबाव टाकल्याच्या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यात काँग्रेसला मोठे यश मिळाले असून हे निकाल म्हणजे आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीतील परिवर्तनाची नांदी आहे असे चव्हाण म्हणाले.
आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यात काँग्रेस पक्षाचे एकूण 34 नगराध्यक्ष आणि 899 नगरसेवक निवडणून आले आहे तर नगरपंचायत निवडणुकीतही काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे आगामी निवडणुकातही काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.