सेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना धनादेश देण्याचा "म्हाडा"चा उपक्रम स्तुत्य - प्रकाश मेहता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2016

सेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना धनादेश देण्याचा "म्हाडा"चा उपक्रम स्तुत्य - प्रकाश मेहता

मुंबई, दि. ३० नोव्हेंबर २०१६ : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मधील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीच्याच दिवशी सत्कार करून त्यांना रजा उपदान व रजा रोखीकरणाचीही रक्कम धनादेशाद्वारे देण्याचा म्हाडा प्रशासनाने सुरु केलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केले.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचारी यांच्या आज आयोजित निरोप समारंभप्रसंगी मेहता बोलत होते. मेहता यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना म्हाडाचे स्मृतिचिन्ह, शाल देऊन गौरवण्यात आले. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे, सचिव डॉ. बी. एन. बास्टेवाड आदी उपस्थित होते.

मेहता म्हणाले की, आयुष्याचा सर्वात मोठा काळ व्यक्ती आपल्या कार्यालयात व्यतीत करते. सरासरी ३५ ते ४० वर्षाचे योगदान एखादी व्यक्ती त्या संस्थेला देते. अशा वेळी संस्थेने देखील त्यांच्या योगदानाचे मूल्य ओळखून या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा दिवस अविस्मरणीय करणे गरजेचे आहे. या दृष्टीने म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम म्हाडातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना समाधान देऊन जाणारा व त्यांच्या दृष्टीने अविस्मरणीय ठरणारा आहे.

आज सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एम. ए. रासकर(उपअभियंता), ए. व्ही. जोशी (सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ), आर. एस. मदन (सहाय्यक), एल. जे. कांबळे (नाईक) यांचा समावेश आहे. म्हाडाने डिसेंबर-२०१५ पासून दर महिन्याला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी रजा उपदान व रजा रोखीकरणाचीही रक्कम धनादेशाद्वारे देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS