सलमान खान महापालिकेच्या हागणदारीमुक्त मोहिमेचे 'सदिच्छा दूत' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2016

सलमान खान महापालिकेच्या हागणदारीमुक्त मोहिमेचे 'सदिच्छा दूत'

महापालिकेला 'बिईन्ग ह्यूमन' या संस्थेद्वारे ५ फिरती शौचालयेमुंबई 17 Dec 2016 - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्र 'हागणदारी मुक्त' करण्यासाठी महापालिका सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. याच अनुषंगाने अभिनेता सलमान खान यांनी महापालिकेच्या 'हागणदारी मुक्त' मोहीमेसाठी संपूर्ण सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी आज त्यांनी स्वतः बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात येऊन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली व महापालिकेच्या 'हागणदारी मुक्त' मोहिमेसाठी'सदिच्छा दूत' म्हणून कार्य करण्याची तयारी दाखविली. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या 'बिईन्ग ह्यूमन' या संस्थेद्वारे महापालिकेला ५ अत्याधुनिक फिरती शौचालये देणार असल्याचेही जाहीर केले.
आपली मुंबई हे आपले घर आहे असे समजून ती स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करा, असेही आवाहनसलमान खान यांनी आजच्या भेटी दरम्यान केले. याप्रसंगी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार,महापालिकेच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, 'बिईन्ग ह्यूमन' या स्वयंसेवी संस्थेच्या अलविरा खान - अग्निहोत्री आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्वयंस्फूर्तपणे पुढे येऊन महापालिकेला सहकार्य करणा-यासलमान खान यांचे आभार मानले. तसेच १ कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असणा-या जगभरातील शहरांमध्ये हागणदारी मुक्तीसाठी प्रयत्न करणारे मुंबई हे पहिले महानगर आहे. महापालिका हागणदारी मुक्तीसाठी प्रयत्न करित असतानाच मुंबईतील सागरी किनारे, सार्वजनिक जागा, कचरा टाकण्यात येणारी ठिकाणे व मुंबईतील नाले या सर्वांबाबत अधिकाधिक स्वच्छता रहावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ३० हजार कर्मचारी नियमितपणे काम करीत असतात. मात्र महापालिकेच्या या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याचीही गरज असते. महापालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी सलमान खान यांनी स्वतःहून पुढे येऊन नागरिकांना केलेले आवाहन निश्चितच मोलाचे ठरणार आहे, असा विश्वासही महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यावेळी व्यक्त केला.

आजच्या भेटी दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना सलमान खान पुढे म्हणाले की, मुंबई ही त्यांची केवळ कर्मभूमीच नाही तर मातृभूमी आहे. ते लहानपणी ज्या परिसरात राहत होते, त्या परिसरात हागणदारीचा प्रश्न किती तीव्र होता? याची आठवण सांगून हागणदारीपासून आपण मुक्ती मिळवलीच पाहिजे, असे आग्रहाने नमूद केले. आपल्या माता भगिनींच्या दृष्टीने मुंबई हागणदारी मुक्त होणे अत्यंत गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच मुंबईच्या साफसफाईसाठी कार्यरत असणा-या महापालिकेच्या कामगारांचा गौरव करताना ते म्हणाले की, अनेकवेळा आपण या कामगारांना 'कचरेवाले'असे म्हणतो; मात्र वस्तुतः आपणच कचरा करीत असतो आणि महापालिकेचे कामगार तो कचरा साफ करीत असतात. ही बाब लक्षात घेऊन आपण सर्वांनीच मुंबई स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी आपापला वाटा उचलून महापालिकेला सहकार्य करण्याचेही आवाहन देखील सलमान खान यांनी आजच्या भेटी दरम्यान केले.

Post Bottom Ad