मुंबई / प्रतिनिधी
मुंबईतील अनेक हॉटेलांमध्ये दिल्या जाणाऱ्या पाण्याचा दर्जा चांगला नसल्याने पान्यापसुं आजारांचा प्रसार होण्याची भीती आहे. यामुळे मुंबईतील सर्व हॉटेलांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसवणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. हॉटेलांना परवाना देताना जलशुद्धीकरण यंत्र बसवणे आवश्यक असणार आहे.
मुंबईत दूषित पाण्यामुळे कावीळ, अतिसार, ताप आदी साथींचे आजार उद्भवतात. पालिका शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा करत असली तरी जलवाहिन्या, पर्जन्यजलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्यांमधून दूषित पाणी मिसळते. तसेच अनेक ठिकाणी पाणी साठवण्याच्या सदोष यंत्रणेमुळे देखील पाणी दूषित होते. मुंबईकरांना हॉटेलांमधून दूषित पाणी मिळू नये, म्हणून खबरदारीच्या उपाययोजनेसाठी जलशुद्धीकरणाची अट पालिकेने घातली आहे.
पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेत्या अधिकृत स्टॉल्सना स्वच्छता व आरोग्याशी संबंधित अटींची पूर्तता करण्याच्या शर्तींवर परवाना दिला जातो. मात्र, बहुसंख्य हॉटेलमालक त्याची पूर्तता करत नाहीत. त्यामुळे यापुढे नवीन परवाना देताना, तसेच परवान्यांचे नुतनीकरण करताना या बाबींची कसून तपासणी केली जाणार आहे.
हॉटेलांत येणाऱ्या ग्राहकांना अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याशी संबंधित त्रास उद्भवू नये त्यामुळे हॉटेल, विविध व्यावसायिक कार्यालयांमध्ये स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसवणे बंधनकारक करण्याची मागणी मनसेचे नगरसेवक व जी उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष सुधीर जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. पालिकेने ठरावाची सूचना मंजूर केली असून याची अमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे.