मुंबई दि. 19 डिसेंबर 2016 -
निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत लोकांना मतदानासाठी दिलेले पैसे घेण्याचे आवाहन करणा-या भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने तात्काळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांची भेट घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना दानवे यांनी मतदानाच्या एक दिवस आधी अचानक लक्ष्मी घरात येते. अशी लक्ष्मी आली तर तिचे स्वागत करा. ती परत करू नका असे वक्तव्य केले आहे. दानवे यांचे हे वक्तव्य म्हणजे मतदारांना पैसे घेऊन मतदान करा असे आवाहन आहे. निवडणूकीत कुठल्याही प्रकारे मतदारांना आमिष दाखवणे हा गुन्हा आहे. दानवे यांनी हा गुन्हा केल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून सिध्द होत आहे. दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांचे वक्तव्य म्हणजे भाजप कार्यकर्त्यांना आदेश तर आहेच परंतु संपूर्ण राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपने पैशाचा गैरवापर केलेला आहे याचे निदर्शक आहे. याचे प्रत्यंतर दानवे यांच्या वक्तव्यानंतर आले आणि पैठण येथे भाजपच्या काही कार्यकर्त्यांना मतदारांना पैसे वाटतानाही अटक करण्यात आली.
या अगोदर भाजपच्या मंत्री आणि आमदारांशी संबंधित लोकांकडून मोठ्या प्रमाणात रोकड हस्तगत करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगासमोर या घटनांचा आलेख या आधीच आलेला आहे. त्यातही काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाबरोबर शासनात सहभागी असलेल्या शिवसेना या सहयोगी पक्षाच्या सामना या मुखपत्रात भाजपतर्फे 500 आणि 1000 हजार रूपयांच्या जुन्या नोटांचा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे असा आरोप केला होता. या संदर्भातील तक्रार दि. 3 डिसेंबर 2016 या दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयोगाने या सर्वांची दखल घेऊन दानवे यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, राजेश शर्मा, प्रकाश मुथा, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांचा समावेश होता.