मुंबई : भायखळा राणी बाग (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय) येथील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या अण्णाभाऊ साठे खुल्या नाट्यगृहाचा विकास करून हे नाट्यगृह बंदिस्त केले जाणार आहे. खुल्या नाट्यगृहातील आवाजामुळे राणीबागेतील प्राण्यांना त्रास होत असल्याने नाट्यगृह अनेक वर्षांपासून बंद होते. सध्या राणीबागेच्या विकासाचे काम सुरू असल्यामुळे त्याचबरोबर नाट्यगृहाच्या पुनर्विकासाचे कामही हाती घेतले जाणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला आहे.
भायखळा येथील राणीबागेत ४00 ते ४५0 प्रेक्षकांची आसन क्षमता असलेले अण्णाभाऊ साठे खुल्या नाट्यगृहाचे सभागृह होते. राणी बागेतील प्राणी व पक्ष्यांना या खुल्या नाट्यगृहात होणार्या कार्यक्रमांच्या आवाजामुळे त्रास होत असल्याने हे नाट्यगृह बंद करण्यात आले होते. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ हे नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. वापरात नसल्यामुळे हे नाट्यगृहच मोडकळीस आले होते. या मोडकळीस आलेल्या नाट्यगृहाचा पुनर्विकास करून तळ अधिक एक मजला असे प्रशस्त नाट्यगृहाचे सभागृह बनवण्यात येणार आहे. ७८0 आसन क्षमतेचे आधुनिक असे बंदिस्त नाट्यगृह उभारले जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिली. या खुल्या नाट्यगृहामध्ये अनेक पोवाड्यांचे कार्यक्रम, नाटके होत असत. आता पुन्हा ही वास्तू नव्या रूपात उभी केली जाणार आहे. या वास्तूशी अण्णाभाऊ साठे यांचे वेगळे नाते होते. त्यांच्या काही आठवणीही होत्या. भावी पिढीलाही त्याची ओळख व्हावी, त्यांच्या आठवणी या नाट्यगृहाच्या माध्यमातून जतन करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचे फणसे यांनी स्पष्ट केले.
ध्वनिप्रदूषणामुळे राणीबागेतील प्राणी व पक्ष्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी २00३ मध्ये हे नाट्यगृह बंदिस्त करून त्याचा पुनर्विकास करण्याच्या सूचना केल्या होत्या. यासाठी २00५ साली महापालिकेने इपिकॉन कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. या सल्लागाराने याचे आराखडे व अंदाजपत्रकही २0१२ ला तयार केले. त्यानंतर या आराखड्यांमध्ये तसेच अंदाजपत्रकात सुधारणा करण्यात आल्या. या सुधारित आराखड्याला मुंबई संस्कृती वारसा जतन समिती आणि इमारत प्रस्ताव विभागाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी ३0 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.