मुंबई: 8 डिसंेबर
मुस्लिम समाजाच्या आरक्षणासंदर्भात रितसर अभ्यास करून त्याबाबतचा कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी एक विशेष समिती नेमण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु असिम आझमी यांनी केली आहे. या संदर्भात बुधवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. तसेच मुस्लिम आरक्षणाचा रितसर प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित करून आरक्षणाच्या निर्णयात कोणतीही कायदेशीर त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याची विनंतीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली.
मराठवाड्यातील लातूर, नांदेड तसेच औरंगाबादच्या सिल्लोडसह राज्याच्या विविध भागात लाखोंच्या संख्येने मुस्लीम बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढले होते. आरक्षणासोबतच मुस्लिम समाजातील व्यक्तींना विनाकारण होणारा त्रास,अटक या मुद्द्यासह मुस्लिम समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी अस्तित्वात असलेल्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे या मुद्द्यांवरही सरकारने उपाययोजना कराव्यात अशी या मोर्चेकऱ्यांची मागणी होती. या शिवाय मुस्लिम पर्सनल लॉमध्ये अकारण होणारा हस्तक्षेप हे देखील मुस्लीम समाजाच्या चिंतेचे एक कारण असल्याची भावना मुस्लिम समाजात रुजत चालली आहे. या सर्व बाबींकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी अझमी यांनी बुधवारी त्यांनी भेट घेतली. तसेच अल्पसंख्यकांमध्ये या सर्व मुद्द्यांवरून चिंतेचे वातावरण असून मुस्लिम समाजाला दिलासा देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणीही त्यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना केली. मुस्लिम समाजाच्या सर्व मागण्यांचा आणि आरक्षणाच्या प्रमुख मागणीचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती तयार करण्याची मागणीही त्यांनी केली. या समितीमध्ये विधिमंडळातील सदस्य आणि काही तज्ज्ञांचा समावेश करून मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवण्याची विनंतीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली.